मोरबंदी

इंदू शिरगांवकर
-----------------------------------------------------------------------------------------------
कोणे एके काळी एक राज्य होते, राज्य होते म्हणजे, राजा होता, राणी होती, वजीर होता, सरदार होते आणि प्रजासुद्धा होती. सगळं काही चांगलं होतं, फक्त एक गोष्ट वाईट म्हणा, किंवा चूक म्हणा, पण त्या राज्याचा राजा आंधळा होता. छोट्या खेड्याच्या एका नगरात आणि त्या नगराचे एका अवाढव्य राज्यात त्या राजाने तरीही कष्टाने  रुपांतर केले होते. त्याकामी त्याने आपल्याकडील सरदार व वजीर यांची वेळोवेळी नेमणूक करून त्यांच्या नजरेने हि कामे करून घेत होता. सगळे काही ठीक चाललेले होते. सगळी आनंदाने जगत होती.  

राजाने एक दिवस वजिराला मोहिमेवर पाठविले. वजीर मोहिमेवर गेला आणि एक सुंदर मोराच्या पिलांची जोडी मोहिमेवरून  परतत असताना घेऊन आला. आल्या आल्या त्याने ती जोडी राजाला भेट दिली आणि त्यातला एक पक्षी मोठा झाल्यानंतर कसा सुंदर दिसेल आणि त्याचा पिसारा कसा छान फुलतो वगैरे सांगितले. पण, राजाला दृष्टी नसल्याने त्याच्या सौंदर्याच्या गोष्टीत त्याला काहीच स्वारस्य नव्हते, पण वजिराने आपुलकीने दिलेली गोष्ट आहे म्हणून त्याने ते आपल्याकडे ठेवले.

मोराच्या पिलांना बघायला लोकांची गर्दी वाढू लागली, ती पिले जसजशी मोठी होऊ लागली तशी ती आणखीनच सुरेख दिसू लागली. पूर्ण वाढ झालेला मोर प्रजेने बघून मोठ्या प्रमाणावर आनंद व्यक्त केला. हळूहळू सामान्य व्यवहारानुसार त्यातल्या लांडोरीने अंडी घातली मग आणखी मोर, आणखी लांडोर जन्माला आले. प्रजा त्यांना बघून खुश होऊ लागली आणि ह्या गोष्टीचा अभिमान वजिराला वाटू लागला. आपण ह्या राज्यात अपूर्व  असे  काहीतरी आणले होते आणि त्यामुळे सगळे कसे मजेत आनंदात आहेत!

पण, इकडे, दिवस जाऊ लागले तसे राज्याची परिस्थिती बिघडत चालली. कुणाला यामागचे कारण काही कळेना झाले. चांगले सुखासमाधानाने जगणारे लोक अचानक गरिबीच्या खाईत लोटले जाऊ लागले. राजाला राज्य कारभार करण्यासाठी पुरेसा कर मिळेना झाला. 

राजाच्या लक्षात हि गोष्ट आली तशी त्याने आपल्या प्रधान मंडळाला कामाला लावले. चौकशी अंती असे समजले कि राज्यात उंदरांचा फार सुळसुळाट झाला आहे, परिणामी पिके चांगली घेण्यात शेतकरी अयशस्वी होत आहे व घेतलेल्या पिकालाही उंदीर फस्त करत आहेत त्यामुळे राज्याचे शेतकरी गरीब झाले आहेत व राज्याचा खजिनाही कमी पडत गेला आहे.

उंदरांची संख्या एवढी कशी काय वाढली हे काही राज्याच्या लक्षात येईना. आजकाल शाळेत विज्ञान च्या वर्गात शिकवितात तसे तेंव्हा एवढे विज्ञान प्रगत नसल्याने कुणालाही उंदीर कसे वाढले हे कळेना. पण, एक सामान्य पण प्रयोगशील शेतकऱ्याने त्याच्या मुळाशी पोचून सर्व प्रकरणाचा उलगडा केला. त्याचे म्हणणे असे होते कि, काही वर्षापूर्वी वजिराने जी मोराच्या पिल्लांची जोडी राजाला भेट दिली होती त्याचा प्रपंच आता मोठा झाला होता व राज्यात आता मोठ्या प्रमाणावर मोर नाचू लागले होते. हे मोर साप खात होते व उंदीर खाणारे साप कमी पडल्याने शेतात व दाराघरात उंदीर वाढले होते. 

हा युक्तिवाद घेऊन जेंव्हा तो शेतकरी वजीराकडे गेला तेंवा वजिराने त्याला फटकाळले आणि त्या शेतकर्याची वेड्यात गणना करून हाकलून दिले. पण शेतकऱ्याला हि गोष्ट काहीही करून सगळ्यांच्या आणि पर्यायाने राजाच्याही लक्षात आणून द्यायची होती. त्याने काहीबाही करून हि गोष्ट राज्याच्या कानापर्यंत पोहोचविली. 

राजाने वजिराला बोलावून घेतले आणि ह्या युक्तिवादावर वजिराचे मत मागितले. वजिराला राजाचे हे बोलणे पटले नाही व त्याने राजाला दिलेल्या भेटीचा राजा असा अपमान करत आहे असे वाटून त्याने आपल्या वजीर पदाचा राजीनामा दिला. राजा आपल्यावर विश्वास ठेवत नाही असे वाटून त्याने प्रधान मंडळातील काही प्रधान व काही सरदार फितवून घेतले. ह्या गोष्टीचा राज्यकारभारावर परिणाम झाला. वजीर नसल्यामुळे व प्रधान व सरदार कामचुकार वागू लागल्याने प्रजेचे व राज्याच्या व्यवहाराचे तीन तेरा वाजून गेले. राजाला काही समजेना व सुचेना, पण आपण व्यक्त केलेल्या मतावर वजिराने अडचणीत आणल्याबद्दल आपण वजिराची माफी मागणे हेही चुकीचे आहे हे त्याला समजत होते. त्याने हि काळजी राणीला बोलून दाखविली. राणीने यावर नीट विचार केला, राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा नेमका अंदाज तिने राजाकडून घेतला आणि राजाला जे सुचविले ते राजाला पटले देखील.

राज्यातील मोर मारणे हा त्यावरच उपाय होता आणि राजाने तो अंमलात आणायचे ठरविले. राजाने तशी दवंडीही देवून टाकली, जो कोणी या राज्यातील सगळे मोर मारायचा विडा उचलेल तो ह्या राज्याचा पुढचा वजीर होईल. हि गोष्ट जशी माजी वजिराच्या कानावर गेली तशी त्याने थायथायाट करायला सुरवात केली. कारण, ह्या गेल्या काही वर्षाच्या कालावधीत मोरांच्या जीवावर त्याने अनेक व्यापार व व्यापारी त्याने तयार केले होते. मोरांची अंडी विकणे, मोरांची पिसे विकणे, मोरांच्य कातडीपासून विविध वस्तू बनवून विकणे असे सह व्यवसाय करून रग्गड पैसा कमावणारे व्यापारी राजाच्या माघारी वजिराने तयार केले होते. त्यामध्ये उत्तम लक्ष्मी वजिराने उभी केली होती, पण, राजाच्या ह्या फतव्याने हे सगळे व्यापारी व स्वतः वजीरही अडचणीत येणार होता.

वजिराने राजाकडे धाव घेतली आणि मोर मारण्याचे तोटे राजाला पटवून देवू लागला. मोर मारल्याने आनंदी प्रजा कशी दुखी होईल हे पटवून देवू लागला. सगळीकडे दैन्य येईल व त्यामुळे सगळे कसे उलटे पुलटे होऊन जाईल हे समजावून सांगू लागला. त्याच्या सुरात सूर मिसळायला त्याने फितविलेले प्रधान व सरदारही जोडीला घेतले. पण राजाला त्याची चूक लक्षात आली होती. प्रजेतील शेतकऱ्यानाही मोराचे दुष्परिणाम माहीत असल्याने त्यांनी ह्य मोहिमेस पाठींबा दर्शविला होता. एका सरदाराने मोर मारण्याचे आव्हान स्वीकारले. राजाने त्याला नवीन वजीर घोषित केले व त्याने आपल्या मोहिमेस प्रारंभ केला.

पण, प्रजेचा पुळका आलेल्या माजी वजीर, प्रधान व सरदारांना काही केल्या हा मोर मारण्याचा निर्णय पटत नव्हता. अखेरीस, राजाने हा निर्णय घेतला आणि त्याची अंमल बजावणी चालू केली. पण, जसजसे मोर मारू लागले तसतसे वजीर व त्याच्या जोडीची मंडळी आग पाखाड सुरु झाली. 

हा नवीन वजीर कसा क्रूर आहे? तो किती निर्दयीपणे मोर मारतोय? तसेच मोरांच्या संहाराने शेतकऱ्यांच्या व जनतेच्या दैनंदिन अडचणी उद्भवत आहेत? मोर दिसायचे कमी झाल्याने प्रजा दुखी आहे वगैरे वगैरे सांगण्याचा खूप आटापिटा चालविला पण, सगळे व्यर्थ.

उलट, प्रजा, नव्या वजिराच्या शौर्याच्या आणि त्याने केलेल्या इतक्या जलद मोहिमेला पाठींबा देवू लागली. सगळीकडे नव्या वजिराचे कौतुक होऊ लागले. आणि अवघ्या पन्नास दिवसात त्याने बरेच मोर मारले. सगळे मोर संपले नसले तरी शेतकऱ्या त्यांच्या उत्पन्नात फरक पडावा एवढी मोरांची सख्या कमी झाली. नव्या वजिराने दूरच्या राज्यातून एका वैदुला आणला आणि राजाच्या डोळ्याचे ऑपरेशन करून घेतले त्यामुळे राजाही आता मोर पाहू शकत होता.

राजाला मोर दिसू लागल्याने त्याने मोरांची गणना करायची आणि त्यांचे नियमन करायचे ठरविले. लोकांना मोर पाळायला प्रवृत्त केले व पाळीव मोराव्यातिरिक्त बाकीचे सर्व मोर मारण्याचे सत्र चालु ठेवले. पाळीव मोरांवर त्याने परवाना लादला व त्यातून उत्पन राज्याच्या खजिन्यात पडू लागले. 

काही प्रमाणात रानटी मोर शिल्लक उरले पण तेही अगदी नगण्य. काही काळ ह्या दंग्याचा आणि गोंधळाचा गेला पण लवकरच सगळे पूर्ववत झाले.


**************** समाप्त ******************

Comments