मद्दान
-इंदू शिरगांवकर
घरात एक पाऊल टाकतो न टाकतो तोच आबाने आपल्या डोक्यावरची मळकटलेली गांधी टोपी उजव्या बाजूच्या बाजल्यावर फेकली. फेकली कसली, आपटलीच म्हणा! घामाने डबडबलेल्या आणि रागाने लाल झालेल्या चेहेऱ्याने आऊला उजघरातूनच हाक मारली आणि खुंटीवरचे घोंगडे भिंतीकडेला मुरकटून त्यावर फतकल मांडले!
"अगं ए, जरा पाणी आण!"
आऊने आबाच्या आवाजातील बदल ओळखला आणि लगबगीन डेऱ्यात तांब्या बुडवून येऊ लागली, तेवढ्यात आबा पुन्हा एकदा ओरडला, "अगं, काय मेली का काय आतच..?"
"आली कि जरा दम धरा वाईच!"
आबाच्या पुढं पाण्याचा तांब्या धरला, आबाने घटाघटा तांब्या एका दमात रिता केला.
"ते न्हवं, काय झालं, एवढं तरपासलायसा का...??"
"तेच्या मायला त्या सरकारच्या...!"
"आत्ता गं बया, सकाळी भाईर पडताना बरं गोडव गायीतच भाईर गेलातासा, आणि आसं दुपारीकड पोचपातुर काय इस्काटलं म्हणायचं?"
"असू दे, सकाळचं येगळ हुतं!"
"सकाळचंच न्हवं, गेला आठवडा बरा खुशीत घालीवलासा, त्यो कोण मोडी का कानडी त्येच्या नावाचं रात ध्याद अभंग म्हनितसा आणि आजच काय व्हो झालं?" आऊने आबाला कोंडीत पकडला.
आता चिडलेला आबा आणखीनच भडकला आणि आपलं उजव्या तर्जनीच नख आऊकडे दाखवून तिला काय उलगडतय का ते आपल्या भडकलेल्या मूडमध्ये पाहू लागला.
"आता गं बया? आता आणि कुठं कसलं मद्दान करून आलासा..? कुट्ट परचार न्हायी, का कोन उमेदवार पैशे घिऊन घराला आल्याला न्हायी आणि तुम्ही मोकाट जाऊन कसलं मद्दान करून आलासा म्हणायचं?"
"केलं, त्या मोदीला..!" उद्विग्न आबाने आपल्या विचारला वाट करून दिली.
"म्हंजी वो? परत निवडणुका कवा लागल्यात्या म्हणायच्या...?" आऊला म्हणजे आता काहीच समजेना झाले.
ती बिचारी निवडणुका म्हटले कि उमेदवार आपल्याघरी येतात, पैसे देतात, आबाला पार्टीला नेतात आणि घरी मटन, साड्या आणि काहीबाही देतात एवढ माहित होते.
लग्न झाल्यापासून आज पर्यंत जवळजवळ २०-२५ निवडणुका आऊने बघितल्या होत्या त्यामध्ये प्रपंचाचे बरेच साहित्य आऊने उभे केले होते. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीला तर त्यांच्या घरात कलर टीव्ही पण आला होता. त्यामुळे, आऊ निवडणुकांची वाटच बघत असायची. फायद्याच्या फडात आबा वाटे करण्यात किती हुशार आहे हे तिला चांगलेच माहित होते. कधीकधी तर आबाने आपल्या घरातील निव्वळ दोन मते दोन वेगवेगळ्या उमेदवारांना देवून दोन्हीकडून भक्कम फायदा उठवला होता. पण एवढा हुशार आबा, या अचानक झालेल्या निवडणुकीत गंडलाच कसा? हे काही तिला उमगेना. नाही म्हणायला तीही थोडी नाराज झाली आणि लढाई हरलेल्या नवऱ्याच्या तोंडाकडे बघत तिथेच उंबऱ्यावर बसती झाली.
"न्हायी न्हायी, सायेब म्हणत्यालंच खर हाय, ह्यो मोडी खरंच काय उपयोगाचा न्हायी!" आबा जरा थंड होईल तसा बोलू लागला.
"व्हय,..." न समजून आऊ सुद्धा आबाच्या सुरात सूर मिसळू लागली.
"असं असतंय व्हय कुट? सगळं असं एकदम बिन कुणाला कळता ठरीवत्यात व्हय? आपुनच सगळं एकदम ठरवायचं, आणि सगळ्यांनी तसं वागायचं व्हय? आसं कुठं आसतंय व्हय?" आबा एकटाच बडबडत सुटला.
"व्हय, खर हाय! बर, आज किच्च जमलं?"
"आय लक्षीमी, तेच तर सांगतोया! सकाळबसनं लायनीत हुभा -हावून कावंटरजवळ पोचलो तर त्या बाईनं पैशे द्यायच्या आदी हात फुडं कराय लावला आणि हि नक्काला शाई लावली." असे म्हणून आबाने आपले नख पुन्हा एकदा आऊला दाखवले.
"बर मग काय झालं?"
"आता कसलं काय हुतया? कालपरेंत बर दोन चार वेळा लायनीत हुबारलं कि वीस भर हाजार बदलून आणलं म्हणून हजार दोन हाजार सायेब हसून दिता! आता ते सगळं बंद हून बसलया!"
आऊला आजून काही समजले नव्हते, ती त्याच निर्विकार चेहेऱ्याने आबाकडे बघत राहिली.
"आगं, लक्षीमी, हि बोटावर शाई मारलीया ती एगदाच पैशे घ्यायचे म्हणून, आता हि शाई जाऊपातुर परत पैशे बदलून मिळणार न्हायीत!" एवढ्या थोडक्या शब्दात आबाने सगळा विषय आऊसमोर व्यवस्थित मांडला आणि आऊला हा सगळा प्रकार समजला.
"बरोबर हाय मालक, हे सरकार खरंच उपेगाचं न्हायी. खातंय गरीब तर त्येला बी सरळ मुकात पडू दित न्हायी. खरंच, मोग्लाई हाय नुस्ती!" आणि बसल्या जाग्यावरच तिनेही कपाळाला हात लावला!
अर्थात, तिच्या तुलनेत तिची अडचण तेवढीच असणार. पंतप्रधानांनी घेतलेला निर्णय, किती मोठा, त्याचा आवाका केवढा? इत्यादीचा विचार ती माउली कितपत करणार? आता, ती अशिक्षित म्हणून बरं, पण असे किती महाभाग आहेत, जे शिकूनही, आऊएवढाच थोडका विचार करत बसलेत...
असो, आऊचा प्रश्न आऊच्या व्यापा एवढा आणि मोदींचा प्रश्न त्यांच्या व्यापाएवढा... शेवटी म्हणतात तसे, प्रश्न ऐपातीचाही असतोच ना...!
***************************
अर्थात, तिच्या तुलनेत तिची अडचण तेवढीच असणार. पंतप्रधानांनी घेतलेला निर्णय, किती मोठा, त्याचा आवाका केवढा? इत्यादीचा विचार ती माउली कितपत करणार? आता, ती अशिक्षित म्हणून बरं, पण असे किती महाभाग आहेत, जे शिकूनही, आऊएवढाच थोडका विचार करत बसलेत...
असो, आऊचा प्रश्न आऊच्या व्यापा एवढा आणि मोदींचा प्रश्न त्यांच्या व्यापाएवढा... शेवटी म्हणतात तसे, प्रश्न ऐपातीचाही असतोच ना...!
***************************

Comments
Post a Comment