गणूची तक्रार

        - इंदू शिरगावकर
         fb.com/INDUJI.in

-

वाट बघून वाट बघून कंटाळलेला मूषक परत राजमहालाकडे पाय आपटत आला. वाड्याच्या दारातूनच  काकी आणि काकांना हाका मारत सुटला. बाहेर हा गलका ऐकून काका काकी दोघेही बाहेर आले. मुषकाला अजून दारात पाहून काकी थोडी संतापलीच. "अरे अजून तू इथेच...??"
मग काय करू काकी, मी एकटाच जाऊ काय? लोक ठेचून ठेचून मारतील मला...! एवढेच पाच दिवस काय तो तोरा मिरवून घेतो मी! पण, या गणेशाने तिथेही माझ्यासाठी विघ्न उभं करून ठेवलंय!" इति मूषकराज
"म्हणजे?" महादेव कन्फुज झाले, "अजून तुम्ही दोघेही पृथ्वीवर गेला नाहीत?"
"अगं बाई! म्हणजे कुठे गेला म्हणायचा हा? ह्याच्या बर्थडे पार्टीसाठी सगळे भक्तगण तिकडे कासावीस होऊन वाट बघत असतील आणि हा अजून पोहोचलाच नाही?"
महादेव एव्हाना वैतागले. त्यांनी आपल्या मोठ्या आवाजात गणेशाला हाक मारली पण उत्तर आलेच नाही. "शोधा त्याला." म्हणत महादेवानी हुकुम सोडला.
सगळ्या कैलासगडावर एव्हाना हि बातमी वाऱ्यासारखी पसरली. देवाधीदेवांचा आदेश ऐकून सगळी उंदीरसेना शोधाशोध करू लागली. कैलासगडावर जो तो गणेशाला शोधू लागला.

शोधाशोधीत जवळ जवळ अर्धा दिवस सरला पण गणेश काही सापडेना. 

दूर तिकडून नंदी चौखूर धावत कैलासगडात दाखल झाला. धावत धावत आला आणि सरळ शंभू महादेवापुढे डिस्क ब्रेक दाबत थांबला. जोर जोरात धापा टाकत त्याने फॉनफुण करायला सुरवात केली. त्याचे बोलणे धड त्यालाही कळेना आणि शंभू महादेवांनाही कळेना.
"अरे, थोडा श्वास घे. शांत हो आणि मग सांग!" असे उमादेवीने सांगितले. तेंव्हा नंदी आपला उजवा खुर छातीवर टेकवत तिथल्याच एका पाषाणावर विसावता झाला. 
श्वास स्थिरावल्यावर नंदी सांगू लागला, "माते, गणेश दूर तिकडे हिमालयाच्या त्या टोकाला जाऊन बसला आहे. मी त्याला विनवणी करून आणण्याचा खूप प्रयत्न केला, पण, तो यायला तयार नाही."
"अरे देवा! अरे नंदी, माझा बाळ ठीक तर आहे ना...?"
"ठीक आहे, माते, एकदम ठीक आहे!"
"मग, का...? तो तिकडे जावून का बसलाय? त्याला माहित नाही का, आज त्याच्या बर्थडेचे सिलेब्रेशन करायला त्याला दहा दिवसासाठी पृथ्वीवर जायचे आहे...!" - स्वयंरुद्र
"होय तात, पण तो तिकडेही जाणार नाही म्हणून रुसून बसलाय..."
"क्काय...?" महादेव संतापले, "हा काय मूर्खपणा आहे? पार्वती, तरी, तुला सांगत होतो, त्याचे जास्त लाड करू नको, किती हट्टी झालाय तो हल्ली...!" महादेवाच्यातला पती आणि पिता एकदम जागृत झाले.
"तुम्ही जरा शांत होता का! नंदी, बाळा, असं झालय तरी काय? काही बोलला का तो तुझ्याकडे...?"
"नाही माते, मला वाटतं, तुम्ही स्वतः तिथे जाऊन सगळी सविस्तर चौकशी केलेली बरी पडेल."
एवढा वेळ हे सगळे पाहून रागात असलेला मूषक मात्र चिंतेत पडला. वर्षातले हे चार सुखाचे दिवस सुद्धा गणेशाच्या असल्या बालिश हट्टाने हातचे निघून जाणार हे बघून तो थोडा चपापला. पण, आता त्यावर पर्याय नव्हता. सगळ्यांच्या पाठोपाठ तोही हिमालयाच्या दुसऱ्या टोकाकडे चालू लागला. 

आपल्याकडे सर्व कैलासगडवासी येताना बघितले आणि गणेशाने आपली सोंड मुरडत पुढा परतला. गुढघ्याभोवती आपले चिमुकले हात वेढत गुढघ्यावर डोके टेकवून बसला. आई पार्वतीने हळूच जावून गणेशाच्या पाठीवरून हात फिरवायला सुरवात केली. "बाळ," आपल्या नाजूक आवाजाने पार्वतीने गणेशाला हाक मारली. पण गणूने ठरवलेच होते. न्नाही म्हणजे न्नाहीच! त्याने आपले हात आणखीच घट्ट आवळले.
"अरे, वेडा आहेस का तू...? माझा शहाणा बाळ ना तो...!"
"..." काहीच उत्तर नाही. मागे सगळेजण उभे राहून हे सगळे नाट्य बघत होते.
"ए वेड्या, अरे असं झालं तरी काय?"
"..." पुन्हा शांतताच.
"हे बघ, काहीही असो, मी माझ्या बाळाच्या बाजूनेच बोलणार!" पार्वतीने आपली मातृप्रेमशस्त्रे वापरायला सुरवात केली. लटक्या रागानेच मागे पाहत त्यांनी शंभूरायांना सांगितले, "हे बघा, माझा बाळ जर बर्थडे पार्टीला जाणार नसेल तर नको जाऊ दे! त्याच्यावर कुणी जबरदस्ती करायची नाही म्हणजे नाही!"
"..." गनू अजूनही समजून घेण्याचा मूडमध्ये नव्हता
"नको जाऊ बाळ हं तू! चल आपण घरी जाऊ या" म्हणत पार्वतीने त्याच्या पाठीमागूनच काखेत हात घातले. तसे गणूने आपले अंग ढिले करत उठायची तयारी केली.

आता सगळेच कैलासगडाकडे चालू लागले. पुढे महादेव, मध्ये गणेश आणि पार्वती आणि मागे सगळा जन समुदाय. पण त्याही मागे एकजण थोडा आणखी नाराज होऊन चालत होता. त्याला आता गणेशाच्या अश्या ह्या वागण्याचा मनातून भरपूर राग येत होता. वर्षभर अवहेलना सहन करूनसुद्धा या पाच दिवसात गणूचा ड्रायव्हर म्हणून जो रुबाब आणि दिमाख मिरवता येत होता तो आता हरवणार होता.

"बाळ नको जाऊ तू पृथ्वीवर, पण, का ते तरी सांगणार ना आपल्या मम्माला..!?"
"..."
"ए बाळा! असा नको ना रे रुसू...सांग ना रे मम्माला...!"
"आई, ..." बोलायला सुरवात करून गनू पुन्हा अचानक शांत झाला.
"काय रे माझ्या सोनुल्या...?"
"मी नाही जाणार!"
"नको ना...! मी कुठे तुला जा म्हणतीये...!"
"अगं, तर काय...? माझा वाढदिवस म्हणतात आणि मला किती त्रास देतात ते लोक...!"
"हं...." आता कारण पार्वती मायींना कळू लागले.
"अगं, काय धिंगाणा घालतात ते लोक...! माझ्या नावाने पट्टी काय उकळतात, रस्ते अडवून मंडप काय घालतात, लाखो करोडो रुपयांचा अक्षरशः चुराडा चुराडा करतात. ते डॉल्बी कि काय म्हणतात ते तर लावून असा नाच करतात कि काहि सांगायला नको. त्यांचे एवढेशे कान त्यामुळे त्यांना एवढा त्रास होत नाही, पण,माझ्या ह्या एवढ्या मोठ्या कानांनी तो आवाज केवढा मोठा वाटतो, तुला काय सांगू आई!"
"हुं" माता पार्वती हुंकार देत होती. शंकरोबाचे कान हि ह्या चर्चेकडे होतेच.
"माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला अक्षरशः जाच सहन करावा लागतोय. सकाळी पाच वाजल्यापासून रात्रीचे बारा बारा वाजेपर्यंत हे लोक मला झोपुसुद्धा देत नाहीत. नुसते दाणादाण आणि ढपाढप! पाहिलं बरं होतं! पहाटे पहाटे कुठेतरी एखादा लाउड स्पीकर लागायचा त्यावर लता आजींच सुंदर "उठा उठा हो सकळीक" ऐकायला यायचं, मग निद्राराणी हळूहळू गुड बाय करायची आणि डोळे किलकिले करत सुंदर दिवसाची सुरवात व्हायची... आणि आता... "तुझी चिमणी उडाली फुर्रर्र" " झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट!" अरे काय चाललाय काय...? काही अर्थ आहे का याला...!"
"अरे तू पेपर वाचत नाहीस का? आता लोक शहाणे झाले आहेत. पोलिसांनी आवाहन केल्यापासून लोक डॉल्बी लावणार नाहीत असे मंडळानी ठरवले आहे.
"आई, तू पेपर वाचतेस पण WhatsApp वाचत नाहीस... परवापर्यंत मीही जरा खुशीत होतो पण परवा एका मेसेजने माझी झोपच उडवली."
"कोणता मेसेज...??" सगळ्यांनाच प्रश्न पडला
"म्हणे... केस तर केस, पण लावणार पायजे तेवढे बेस...! बघतो कोण अडवतो ते...! म्हणजे माझा सासुरवास काही संपणार नाहीच...!"
"अरे बाळा, पण या वर्षी बरेच विधायक उपक्रम राबविले जाणार आहेत. कोल्हापुरात तर जवळ जवळ १०० टक्क्यापर्यंत डॉल्बीला फाटा देताहेत. तसेच पारंपारिक ढोल पथके तयार झाली आहेत. करवीर नाद आणि बरीच नवी मंडळे`तयार झाली आहेत. त्यांचा ढोलाचा ठेका तू ऐकला नाहीस तर खूप काही मिस करशील. आणि हो तुझी आई सुद्धा technosavi आहे बर का... परवाच एका मंडळाचा मला whatsapp मेसेज आलाय. या वर्षी  त्या मंडळाने म्हणे नारळा ऐवजी वही पेन घेण्याचे ठरविले आहे आणि ते वही पेन गरीब व हुशार विध्यार्थ्यांना वाटणार आहेत. एवढेच नाही. या वर्षापासून जल प्रदूषण कमी व्हावे म्हणून बरीच मंडळे मूर्तीदान करणार आहेत. हे आणि असे भरपूर प्रकल्प पुरोगामी कोल्हापुराने राबविले आहेत. तुला आणखी कुठे जायचे नसले तर नको जाऊ पण, या वर्षीचा कोल्हापुरातला तुझा तुझ्या बर्थडे पार्टीचा नाविन्याचा अनुभव तरी तू घेवून ये."
" खरंच आई?" आता गणेशाचा राग थोडासा लोप पावला होतं आणि त्या रागाची जागा आता उत्सुकतेने घेतली होती.
"हो रे सोन्या... तू जा आणि बघ... या वर्षी तुला निश्चित एक वेगळा अनुभव मिळेल. या वर्षी माणुसकी जिवंत होताना तुला बघायला मिळेल."
"खरंच आई, मला आता कधी एकदा कोल्हापुरात पोचतोय असे झालेय."
इतका वेळ मागे निराश होऊन चालणारा मूषक हे सगळे ऐकत होता आणि त्याला थोडा आशेचा किरण दिसू लागला. तो धावतच पुढे आला. 
"बाळ सांभाळून जा. या वर्षी सगळेच एकदम बदलले नसेल पण नाराज होऊ नको. हि बदलाची सुरवात आहे. थोडे थोडे सकारात्मक बदल घडत जातील तेंव्हा जे सकारात्मक बदल करताहेत, समाजोपयोगी गणेशोत्सव करताहेत त्यांना भरपूर आशीर्वाद दे. जे बदलाच्या वाटेवर आहेत त्यांना बदल स्वीकारण्याची ताकद दे आणि जे बदलाकडे पाठ फिरवून आहेत त्यांना सुबुद्धी दे."
"हो आई, नक्कीच..." असे बोलून गणू मूषकाबरोबर पुढे दुडूदुडू धावत गेला. पुढे जात मागे पाहत त्यांनी सर्वांना tata बाय बाय केले आणि धावत धावत दिसेनासे झाले.
इकडे शंभू महादेवांना पार्वतीची हि खेळी यशस्वी लक्षात आले. ते थांबले पार्वती येवून त्यांच्या बरोबर पोहोचली आणि ते पुढे पाहून चालू लागले.
"चला आता आपल्यालाही लवकर पोचायला हवे. गणू पाठोपाठ आम्हालाही तिकडे जायचे आहे. लक्षात आहे न...??" 
शंभू देवांनी पार्वतीकडे एक हसरा कटाक्ष टाकला आणि पायांची गती वाढवली.

© इंदू  शिरगावकर


fb.com/INDUJI.in

Comments