ढब्बू कशी दिली?

- इंदू



सकाळी बायकोने "येताना मेथीची भाजी घेवून या हं!" सांगितले होतेच. ऑफिसमधून निघताना जाणून बुजून आडरस्त्याने बाईक घेऊन मंडईकडे पोचलो. फिरण्याच्या नादात विसरायला नको म्हणून ताबडतोब पहिली मेथी अगदी चार जुड्या घेतली. आणखी काहीबाही घ्यावे म्हणून मंडईत इकडे तिकडे भटकू लागलो.पुढे जात होतो तसा काही तरी किरकोळ किरकोळ घेत होतो. तशी ती माझी आवडीची सवई! कधी कधी नको असलेल्या गोष्टीसुद्धा घरात पोचत असत आणि मग घरात सौभाग्यवती जो सत्यनारायण घालत होत्या तो झोपे पर्यंत सुरूच असायचा. कोपऱ्यावरच्या एका मध्यमवयीन बाईकडे ढब्बू मिरच्या दिसल्या म्हणून पोचलो. कश्या किलो? एवढ्याला द्या वगैरे थोडा थोडका वाद झाल्यानंतर ढब्बू निवडून घेवू लागलो. एवढ्यात मागून "मावशी, ढब्बू कशी दिली हो?" असा प्रश्न करणारा आवाज काही ओळखीचा वाटला. दचकलो, आणि थोडा उभा होत मागे बघितले तर, अंगातून थंड शिरशिरी चमकून गेली. "ती" होती. बऱ्याच दिवसांनी दिसली. मला असा बघून तीही थोडी थबकली. कदाचित मी इथे असा दिसेन, भेटेन हे तिलाही अपेक्षित नव्हते. बोलावे कि न बोलावे हे तिलाही समजेना आणि मलाही कळेना झाले होते. तरही, काहीतरी बोलावे, म्हणून मीच सुरवात केली.
"तू? काय?" मला अजूनही नीट सावरता येईना झाले होते. 

"काही नाही, भाजी घ्यायला आले होते." कदाचित या गोंधळात तिला मला काय म्हणायचे होते ते समजले होते. आणि तितक्याच तत्परतेने ती सावरून बोलू लागली.

"कोण आलंय बरोबर?" मी अजूनही काय विचारायचं या संभ्रमात काहीही विचारत होतो.

"कुणी नाही, मी एकटीच येते नेहमी. जवळच आहे घर इथून" 

"कशी आहेस?"

"बरी आहे, तू कसा आहेस?" 

"म मी? मी आहे न बरा! एकदम मस्त!"

"इकडे?" तिने मला इथे मंडईत येण्याबद्दल यशस्वी गुगली टाकली

"हां, इकडे..? आलो होतो असाच! थोडी खरेदी करायची म्हणून...!"

"नेहमी खरेदी असते कि...??"

"छे छे...! आज! आजच आलोय... नेहमी तीच जात असते मार्केटला!" चोरी सापडल्यासारखे झाले आणि मला उगाचच लाजायला आले. 
तीही थोडी पाहिल्यासाराखीच खुदकन हसली.

"कित्ती बावरातोस अजूनही!" आणि खळखळून हसायला लागली.
तशीच निर्झरासारखी! मीही तिला तसाच बघत राहिलो. "तस्साच आहेस" हसे आवरत ती पुढे बोलली आणि मी भानावर आलो.

मी हि कसाबसा हसायचा प्रयत्न करू लागलो. तिच्या हसण्यात हसू मिसळू लागलो.

"बाकी..?" मी 

"काही नाही! चाललंय!"  ती सहजच बोलली पण चेहऱ्यावरचे हसे अचानक मावळले. माझ्या नजरेतून ते सुटले नाहीच. आत कुठे तरी दुखले होते, ती कळ चेहरा लपवू शकला नव्हता आणि डोळे गप्प राहूच शकत नव्हते.
तिने नजर परतण्याचा प्रयत्न केला, पण निष्फळ! काही लपले नव्हते, लपणारही नव्हते, म्हणून, पुन्हा माझ्याकडे परतून मला विचारू लागली.

"तुझं? तुझं कसं काय...??"

मलाही काही बोलवेना. तिचं दुखणं बघून मला माझं "उत्तम" आहे हे सांगवेना. तिचं दुखणं तिने न सांगताही मला कळलं होतं. कशाला उगाच जखमेवर मीठ चोळा म्हणून विषय बदलायचा प्रयत्न करू लागलो. 

"चल, कुठे चहा घेवू या!" मी 


"ओ सायेब! ह्या मिरच्या?" मी काहीतरी चुकतंय हे लक्षात आम्ही दोघेही भानावर आलो. बाजूला बघितलं तर ती भाजीवाली खाली मांडलेल्या मिरच्याकडे आपला डावा हात करून एकदा तिच्याकडे तर एकदा माझ्याकडे बघत होती. का कुणास ठावूक पण ती भाजीवाली थोडी रागावल्यासारखी वाटली.

***************************************

Comments