*मन चंद्रभागा तीर*

-इंदू
          

विठ्ठलाच्या भक्तीत लीन होणार नाही असे मन मराठी मातीत सापडणार नाही. मनाची अनेक रूपे पण ते प्रत्येक रूप विठ्ठलाचे प्रतिरूपच व्हावे. भक्तीच्या गंधाने ओतप्रोत दरवळणारे हे मन पांडुरंगाच्या चरणी या भाक्तीरुपणे मी अर्पण करतो.

मन चंद्रभागा तीर
चित्त वृत्तीचे माहेर
खोल विहीर कि आड
दिसे उथळ बाहेर

मन सावळे सावळे
रूप तुझे गा विठ्ठला
सखा मोक्षदाता माझा
माय बाप बंधू भला

मन कस्तुरी कस्तुरी
रानी सुवासिक गंध
कोण कुपी कुठे जाणे
केली अंतरात बंद

मन मोहोळ मोहोळ
मध वाणीचा कोमल 
गुंजारव नामजप
नीज मूर्ती त्वा शामल

दास विठ्ठले म्या इंदू
जाला वैष्णव कीर्तनी
देई देई मज मुक्ती
वाहो जीवने अर्चनी

🌷🌷 ***🌷🌷


Comments