विठूराया
-इंदू
विठ्ठलाची भक्ती आणि त्या भक्तीची गोडी अवीट आहे. जितकी चाखावी तितकी गोड, तितकी मनोहर... ह्या सावळ्या रुपाची ओढ टाळावी तितकी अधिक आणि जितके दूर जावे तितकी जवळ ओढणारी. संसाराच्या पाशातून सुटका नाही, पण तरीही हि ओढ अगदी तसूभरही कमी न होणारी. ह्या भक्तीमुळेच हे ताप व्याप सुसह्य होतात. सारा शिन नाहीसा व्हावा इतके चैतन्य या नामात, या रुपात आहे.
मन झाले रे अधीर
तुझ्याओढी विठूराया
पायी प्रपंचाचे बंध
तूच तोडी विठूराया
कधी नेशील नेशील
भिमानीरी रे नहाया
पापे क्षाळोनी देहाची
शुद्धी करी विठूराया
ऐकवीशी तो गजर
कधी लाविशी नाचाया
दंगवूनी रे कीर्तनी
रंगवीशी विठूराया
मूर्ती म्हणे मनोहर
तुझी तेज पुंज काया
कधी दाखविशी तुझे
आत्मरूप विठूराया
इंदू असाच गुंतला
व्याप लागले वाढाया
तुझी आस तसूभरी
कमी नाही विठूराया
🌷🌷 *🌷🌷
Comments
Post a Comment