सोळा नव्हे, सोहळा!
-इंदू
induji.in
सन २०१६ आले तेंव्हा दर वर्षाप्रमाणे हाही येवून जाईल असेच वाटत होते. पण, हे वर्ष मला वेगवेगळ्या वाटेवरून वेगवेगळ्या वळणावरून नेणारं ठरलं.यापूर्वीच्या कोणत्याही वर्षात इतका त्रास व आटापिटा सहन करावा लागला नव्हता इतका तो या वर्षात बघावा लागला, भोगावा लागला. पण, हे वर्ष जेवढं त्रासदायक होतं त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने आनंददायी ठरले. कारण, या वर्षी मी अनेक चांगले उपक्रम माझ्या वैयक्तिक आयुष्यात सुरु करू शकलो. त्यातील बरेच यशस्वी झाले देखील!
सुरवातीच्या काळात त्याचा फारसा परिणाम बघायला मिळाला नाही, पण जसा जसा तो शेवटाकडे पोहोचू लागला, तसा त्याची गोड फळे दिसू लागली. या सोळाच्या जीवावर आता येती बरीच वर्षे अनेक उंच भराऱ्या घेतील. पण, या सर्वांचा पाया या सोळाने घातलाय. कदाचित, उंच उंच इमारतीकडे पाहताना लोकांचे त्याच्या पायाच्या दगडाकडे लक्ष जात नाही., तसेच काहीसे या वर्षाच्या बाबतीतही होईल. होईलही! नाकारता येत नाही. पण म्हणून त्याचे महत्व कमी निश्चित होत नाही. हे वर्ष अढळपणे स्थापले गेलेय याची आता शाश्वती झाली आहे. या वर्षाने अनेक उपकार केलेत, त्यामुळे ते अधिक विलोभनीय आणि हवे हवेसे झाले आहे. त्याचा मोह मला अजूनही संपत नाहीय. हे वर्ष कदाचित आणखीन दोन चार महिने असते तर बरं झालं असतं, असं काहीसं मला मनोमन वाटतंय.
हे वर्ष हि केवळ एक कल्पना आहे, त्यामुळे, त्याला स्पर्श करून पाहता, अनुभवता येत नाहीय. त्याला स्पर्श करता येत असता तर कदाचित मी त्याच्या गळ्यात पडून घट्ट मिठीच मारली असती. त्याचे पटापट मुके घेतले असते. त्याला असाच बिलगून राहिलो असतो. इतका आसक्त मी कधीच कुठल्या इतर गोष्टीला झालेला मला आठवत नाही. मनोमन खूप प्रेम आणि जिव्हाळा वाटू लागलाय आणि जसा जसा काळ सरकेल तसा तो अधिकच गडद वाटू लागलाय.
या वर्षीच्या सुरवातीला मी तीन "पण" केले होते. त्यापैकी दोन पूर्ण झाले. ते म्हणजे, एक बहारदार, हा माझा गाण्यांचा कार्यक्रम करणे आणि दुसरा लिखाण करणे. एप्रिल महिन्यात मी माझा गाण्याचा कार्यक्रम केला. अतिशय चांगला प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमाचे पुढचे प्रयोग माझ्या व्यस्त जीवनामुळे करू शकलो नाही, पण हा शेवट निश्चित नाही. अजून चांगला आणि सुंदर असा 'बहारदार' येणार आहे. तसेच, दुसरा म्हणजे, लिखाण करणे. या वर्षी मी रोज काही ना काहीतरी लिहायचे हा पण केला होता. आणि त्यामुळे मी किती आणि काही भरपूर लिहू शकलो. लेखक, कवी हि ओळख निर्माण करण्यास हि सुरवात, खरच, खूप चांगली होती. याचा परिपाक म्हणून ऑक्टोबर महिन्यापासून अनेक लिखाणाची कामे येत गेली. आणि डिसेंबर अखेर मी इतका इतका व्यस्त आहे कि येते दीड-दोन महिने काही नवीन काम घेणे मला शक्यच नाही.
असो, हे तर चालायचंच. नुसतंच जगणं या वर्षी मी सोडून दिलं. 'मोठ्ठ जगणं' हा नवा अध्याय आयुष्यात या सोळाने सुरु करून दिलाय. अजून अनेक नवी क्षितिजे गाठायची आहेत. अजून खूप मोठ्ठ्या भराऱ्या मारायच्या आहेत. जीवनाचा खरा आस्वाद घेता येईल तितका घ्यायचा आहे. जगताना उद्याच्या पलीकडे न बघता जगायचे आहे. मारताना हसत आणि समाधानाने मरण स्वीकारायचे आहे. उगाच, काहीतरी राहून गेल्याची हुरहूर आत्म्याला द्यायची नाहीय. शुभेच्च्छा असू देत. तसेच आपण सर्वांनाही या येत्या नव्या वर्षाच्या खूप खूप शुभेच्च्छा!
.............................
जातोस मित्रा? जा आता!
तू जाशील आणि सतरा येईल.
पण येणाऱ्या सतराच्या ओढीपेक्षा
तुझ्या जाण्याचे दुख: जास्तंय!
आलास तेंव्हा किती म्हणून स्वागत तुझे!
आणि आता जाताना हात सोडवेना...
खूप वेगळा होतास, पण तू हां!
वेगळा म्हणून आलास
आणि खूप वेगळा म्हणून निघालास...
कधी नव्हे तो मोठी स्वप्ने आणलीस!
कधी नव्हे ती मोठी क्षितिजे दाखवलीस!
माझी ओळख बनविण्यात,
मित्रा, तूच खरा मोठ्ठा हिस्सेदार आहेस...
तुझ्या आठवणी...
आता सांगाव्या तेवढ्या थोड्याच!
आणि परत मीही सगळेच विसरून जाईन...
लक्षात राहशील तो केवळ नावानेच.
सोळा, तू सोळा नव्हतास!
तू सोहळा होतास...
माझ्या आयुष्यातील
सुखाचा एक सुंदर सोहळा...
आठवशील खूप...
नाही, आठवावासंच...
🌷🌷 ***🌷🌷
Comments
Post a Comment