*लग्नाचं दुकान*
-इंदू
induji9.blogspot.in
fb.com/INDUJI.in
चड्डीतून फिरणारे पाय पँटेत शिरले. बघता बघता ज्युनियर कॉलेजमधून सिनियर कॉलेजमध्ये गेलोसुद्धा आणि बी कॉम कम्प्लीट होऊन छोटीशी नोकरीसुद्धा लागली. एका धान्य व्यापाऱ्याच्या पेढीवर कारकून म्हणून रुजू झालो. घरात पगार येवून पडू लागला. आणि काय बिनसले देव जाणे आईला सुनेचा चेहरा बघावेसे वाटू लागले. येता जाता विषय बदलून काढून मला सूचना मिळू लागल्या. आतून कितीतरी गुदगुल्या होत असल्या तरीही मी त्यावर मनात असूनही मनभरून मत प्रदर्शन टाळू लागलो. आता मी शांत आहे असे वाटू लागले, तसा, घरात वेगळाच संशय वाढू लागला. पोरगं विषय टाळतय म्हणजे 'कुट्टंतरी आसणार, बगा!' असले सल्ले देणारेही हळूहळू माझ्या देखत आई बाबांना सुचवून मला टोमणे मारू लागले. तशी 'पाखरे कधीचीच उडून गेली' हे सांगणे म्हणजे हात दाखवून अवलक्षण करून घेण्यासारखे होते म्हणून न बोलणे, हि दुसरी कुचंबना होती. "तसा करीत आसला तर करुंदे कि त्ये ल्हेव म्ह्यारेज!" हि तीर्थरूपांची सूचनाही मध्यंतरी उडत उडत कानावर येवून गेली. पण, तूर्त सभोवती सगळे सुंदर विलोभनीय घडत असताना मला त्याचे रसपान करता येत नव्हते. कि ते कसे करायचे असते हे मला समजत नव्हते. काहीही असेना, पण, भारीपैकी बाईक दारात उभी होती आणि त्याची चावी सापडत नव्हती असे काहीसे या बाबतीत होत चालले होते.
मागच्याच एक दिवशी सकाळी सकाळीच दारातून माझ्या नावाचा जप करीत मन्या उभा होता. मी अंघोळ करतोय म्हटल्यावर, आईने त्याला चहा करेपर्यंत बसवलं होतं. मन्या चक्क आमच्या घरात बसलाय आणि आई त्याला चहा करून देतेय हे खरंतर अश्यक्य कोटीतीलं होतं. आमच्या तीर्थरुपांच्या भीतीने आजपर्यंत कधी आमच्या घराचा उंबरा ओलांडून मन्याने गृहप्रवेश केला नव्हता. तसे ढुंगणावरचे टीव्ही कधी फाटेपर्यंत तर कधी फुटेपर्यंतही आमच्या आबांनी आम्हाला बालपणी प्रसाद दिले होते. आमचे जमदग्नी आणि मन्याचे परशुराम! त्यामुळे मन्या आमच्या आणि मी मन्याच्या घरी पाउल टाकले नव्हते. पण, आज मन्या मला भेटायला घरात आला होता हे मला आंघोळ संपेपर्यंत काही केल्या उलगडेना.
बावरल्या तोंडाने लगबगीने अंग पुसत पुसत बाहेर उजघरात पोचलो तर मन्या आमच्या उजघरातील भिंतीवरील फोटो, कॅलेंडर, आडे, वासे बघत बघत चक्क पोहे हादडत होता आणि आमचे पिताश्री त्याच्याशी हसऱ्या चेहऱ्याने वार्तालाप करण्यात व्यग्र!? आता तर मी पुरताच उडालो. पटदिशी परत आत गेलो आणि कपडे घालून बाहेर आलो. त्याला चल चल म्हणत घरातून जवळ जवळ ओढूनच बाहेर आणला. गल्लीच्या तिकटीपर्यंत मी तरातरा चालत आलो.
"आयला दिन्या, भारी हाय कि तुजा आबा! सुदारला म्हणायचा की!" मन्याने मागून धावत्या पावलांनी मला गाठत डावा दंड धरून उजव्या खांद्यावर राप्प करून धपाटा घातला आणि तसाच आपला उजवा हात माझ्या खांद्यावर मानेवर घातला.
"तेच्या मायला, लेका कुणीकडं दिवस उगावला, लेका माज्या चीक्कीत जाळ झालाया!"
"तर काय मर्दा...!" म्हणत त्याने माझ्या पुढं टाळीसाठी हात केला आणि मीपण टाळी दिली. मन्या म्हणजे माझा जीवश्च कंठश्च लंगोटी यार. दोघांनी जेवढे आंबे बरोबर खाल्ले त्यापेक्षा जास्त छड्या, म्हणू नका, मार म्हणू नका, लाथा, बुक्क्या, दणके, रप्पाटे या ताडन प्रकारातले सर्व काही आम्ही बरोबरीने खाल्ले होते. एवढे सगळे जरी असले तरीही, माझ्यापेक्षा जरा जास्त धाडशी मन्याच! मारा, हाणा, धोपटा, आपटा, काहीही करा, पण जेवढे मारावे तेवढा हा पट्ट्या दिवसागणिक धीट होत गेलेला. त्याच डोकं म्हणजे आयाडीयाचं गोडावूनच होतं. कायतरी विलक्षण कल्पना त्याला सुचत आणि मग त्या कल्पना प्रत्यक्षात उतरल्या कि आमची दोघांचीही बुडे सुजत. सुचण्यापासून सुजण्यापर्यंतच्या या प्रत्येक प्रवासात मी नेहमीच त्याचा सांगाती असे, पण, म्होरक्या मात्र तोच. टारगट, माँड, इदरकल्याणी ही आणि असली बरेचशी बिरुदे त्याने सन्मानाने आणि कष्टाने मिळविली होती. तर असा हा मन्या म्हणजे अगदी दोन रुपयात लागलेली लाखाची लॉटरी!
"बर ते जाऊ दे लेका... तू असा एकदम कसा काय डॉन झालास? आणि आबासंग एवढा रुळलास कसा काय...?"
"मग मर्दा, आपली कॅर्डीट हायीच तशी...!" इति मनोहरपंत उर्फ मन्या
"ए मर्दा, उगच लांबवू नगो, सांग की सांग..." मी घयकुतीलाच आलो होतो.
मन्या काही भाव खायचे सोडत नव्हता. बोलत बोलत आम्ही नदीकडे पोचलो. आमच्या नेहमीच्या अड्ड्यावर म्हणजेच, नदीत तिरपे गेलेल्या बच्च्याच्या झाडाच्या एका लांब खोडावर जावून पाण्यात पाय सोडून बसलो. आणि मन्याने सांगायला सुरवात केली.
"आर लेका, काल गंगूकाकी घरला आलती. कायतरी बोंबाबोंब असणार म्हणून पयल्यांदा तिला बगून मी गारच पडलोतो. खरं, माज्याकडं जरा हासून बगीटल्याव जरा जीवात जीव आला. आईच्या फुड्यातच गंगूकाकीन तुज्या लग्नाचा इषय काडलाता. म्हणली, पोरगं काय मनावं घीना झालंय! बादा झाल्यावानी करतंय. काय व्हय-न्हायी कायीच संगीना झालंय म्हून आलोतो. तुमचा म्नोवर आन त्यो जोडीदार हायीत म्हणल्याव त्येला तरी काय तरी म्हयीत आसल. म्हणावं, आसली तर आसू दे. आमी काय तिला नागो म्हणीत न्हायी. खरं, आमाला दाक्वाय सांगाय नगो का?!"
"लेका, तुला काय म्हयीत न्हायी व्हय!" मी त्याच्या मांडीवर थापत मारली.
"मग मी सांगितलंय की! तसं काय न्हायी म्हणून! तर म्हणली, प्वार भित्तंय बाला, म्हणून सांगीत नसंल. आणि आसलं तरी काय हारकत न्हायी. म्हणून मग म्हणली, उद्या यीवून काय त्यो इषय करा. सकाळचं पयलं काम हेच कर म्हणली. म्हणून आलोतो सक्काळी सक्काळी तुज्या घरला!"
"मग सांग की, तयार हाय म्हणून! काय फरक पडतुय, लह्व म्यारेज आणि यारेंज म्यारेज केलं तरी!"
"ये येडा हाय काय..? म्हणं काय फरक पडतुय...!"
"तर काय? काय फरक हाय...?"
"बाबा, लय फरक हाय...!" मन्या आता हा-हु ची भाषा करू लागला. जर काय महत्वाचं आणि बहुमोल असलं कि तो असाच सूर काढून हा... हु... करून बोलू लागतो. तसाच तो आताही बोलू लागला होता. मला मात्र काहीच समजत नव्हते.
"हे बघ! म्हणजे कसं आसतय..." असं मन्या बोलला कि समजायचं, कि आता खूप मोठ्या तत्वज्ञानाचा उलगडा होणार आहे. मन्याने आता बसलेल्या झाडाच्या खोडावर घोड्यावर बसतात तशी माझ्याकडे पुढा करून मांड मारली आणि आपली दोन्ही हाताची बोटे खोडावर टेकवून हातांचे घोडे करून तिकडे लक्षपूर्वक बघून सांगू लागला. "हे मणजे लव्ह म्ह्यारेज आणि हे म्हंजे येआरेंज!" उजवा डावा हात उदाहरणासाठी दाखवून तो सांगू लागला.
"हुं", मी हुंकार भरू लागलो. मन्या असले काही सांगू लागला कि मलाही काहीतरी नवीन ऐकायला मिळतंय म्हणून नेहमी त्याला हुंकार देवून मी ऐकायातोय हे दर्शवायचो, ते आताही करत होतो.
"यारेंज म्यारेज म्हंजे... म्हणजे कसं आसतंय म्हयताय का... ते म्हंजे आसतंय आपल्या गावातलं रेशनचं दुकान! तित्तं आपल्याला राकील मिळतंय, तांदूळ मिळतंय, घव मिळतंय! खरं आपल्याला नुसतं तेवढ्याव घर चालतंय का...? न्हायी! बरं, ते बी चालवू, खरं आपल्याला पायजे तवा पायजे तेवडं मिळतंय का...?? न्हायी! ते कवा दुकानदार यील तवा, त्यो दिल तसं आणि दिल तेवडं घ्यून गपगार राह्यचं! म्हंजी आपल्या मर्जीवर काय चालत न्हायी. तसं लव्ह म्यारेजचं नसतंय! ते म्हंजी कसं? आता तू वॉनलाईन कायतरी घेतोयास बग, म्हंजी मोबाईल-बिबाईल तसं! ते कसं चीव्वीस तास चालू आसतंय? आपल्याला कवा पायजे तवा ओर्डर टाकायची आणि लगीच आपली ओर्डर शिव्कारत्यात! तसं आसतंय हे, फकस्त आपल्याकडं थोडं पैशे खुळखुळायला लागत्यात."
या नव्या दृष्टांताने माझे डोळ्यासमोरील सगळी जळमटे झटकन निघून गेली आणि सगळे आकाश निरभ्र झाले. पण, आणि एक अचानक एक शंका मनात येवून गेली.
"आर बाबा, खरं तू गावातली दुकानं सांगायची इसारालास कि...!"
"हां आता कसा आलास पत्त्यावर...!" मन्या जरा खुश झाला, "हि दुकानं म्हणजी आपली पावण्या-पयातील आणि वाळकीच्यातली...! हितं सगळं कसं ग्यारेंटीचं! चुकून काय बिनास्लं, बिगाडलंच तर बोलाय येतय!" इति जगद्गुरू श्री श्री स्वामी मनोहरपंत महाराज.
मला तर आता नवा आत्मसाक्षात्कारच झाला, "मन्या, हे लेका तू लय भारी सांगितलंस. आपन आसं करूंया, आमी गावातली दुकानं बगुया! सांग आबास्नी!" मन्याच्या घोडा केलेल्या उपड्या हातावर चपाट मारून मी लगबगीन झाडावरून उठता झालो आणि घराच्या दिशेने मनातल्या मनात हसत चालू लागलो. मन्या बसल्या खोडावरुनच माझ्या पाठमोऱ्या मूर्तीकडे बघत राहिला.
🌷🌷 ** समाप्त **🌷🌷

Comments
Post a Comment