*शिवगर्जना*
      ---इंदू
          INDUJI.in

२०१७ सालची सुरवात एक वीर रस पूर्ण रचनेने व्हावे यासारखे सुंदर काही नाही. आणि शिव स्तवनाने सुरवात व्हावी यासारखा आणखी दुसरा महात्भाग्याचा दिवस नाही. दोन दिवसापूर्वी *शिवगर्जना* या *आशिया खंडातील सर्वात मोठ्या महानाट्या*चे निर्माते व दिग्दर्शक *श्री स्वप्नील यादव* यांची भेट झाली. त्यांच्या या वर्षीच्या महानाट्याच्या नियोजनासंदर्भात हि भेट होती. अशा या महानाट्याचा आपणही कुठेतरी हिस्सा होतोय याचे खूप मोठे समाधान मनात होते. आणि त्याही पेक्षा मोठे म्हणजे, शिवरायांच्या जीवनावरील एखाद्या कलाकृतीला आपला हातभार लागावा यासारखी सुदैवाची गोष्ट कोणती असू शकते? गेले दोन दिवस हाच ठेका मनात फेर धरून नाचत होता. नगारे, घोडे, तुताऱ्या, भाले, तलवारी, जिरेटोप आणि सर्वकाही अंगातून आणि रक्तातून वाहत होते. अस्वस्थ दोन दिवसानंतर जे काही भळाभळा वाहू लागले, ते हे असे होते.

पुन्हा तुताऱ्या उंच धरा रे
मनात शिवगर्जना स्मरा रे
पुन्हा चौघडे झणाणू द्या रे
क्षणात शिवगर्जना स्मरा रे

पुन्हा जिजाऊ शिल्पील शिव तो
अभिषिक्त रायरो रुधीर तो
पुन्हा उगवतील किरणे भगवी
गर्जून गुंजे सह्य कडा रे
पुन्हा तुताऱ्या उंच धरा रे
मनात शिवगर्जना स्मरा रे

सजे पाळणा गड शिवनेरी
इतिहासीचे पान सोनेरी
उजळून जातील दिशादिशा ह्या
जरी पटका तो उंच करा रे
पुन्हा तुताऱ्या उंच धरा रे
मनात शिवगर्जना स्मरा रे

धमण्यामधुनी ज्वाळा ठासून
गगन अखंडित घेतील ग्रासून
समशेरींच्या उजळून धारा
लखलख त्याची मनी भरा रे
पुन्हा तुताऱ्या उंच धरा रे
मनात शिवगर्जना स्मरा रे

पुन्हा खिदळतील टापा चौखूर
व्यापेल दखनी हर हर हरसुर
पुलकित करण्या राष्ट्र महा हे
शिवछत्रपती उच्चार करा रे
पुन्हा तुताऱ्या उंच धरा रे
मनात शिवगर्जना स्मरा रे
पुन्हा चौघडे झणाणू द्या रे
क्षणात शिवगर्जना स्मरा रे

🌷🌷 ***🌷🌷

Comments