गोड बोला
सक्काळचे साडेआठ वाजले होते. आधीच ऑफिसला उशीर झाला होता म्हणून घाई गडबडीने bag खांद्याला मारून अंगणातल्या गाडीवर बसलो एवढ्यात "दादा थांब जरा!" म्हणून वरून गच्चीतून आवाज आला. दचकुनच वर बघितले तर आमचे सगळ्यात शेवटचे बंधुराज माझ्याकडे बघत होते. आमच्या चार जणांच्यामधील हे शेवटचे महाशय गेले कित्येक वर्षे बोलत नव्हते. तसे आम्ही चौघेही आई बाबांच्या देहावसनानंतर आम्ही वेगळे राहून १५ वर्षे होऊन गेली होती आणि कधी समोरासमोर बोललो असल्याचे मला आठवत नव्हते. पण, आज अचानक मला कशी काय हाक मारली हे कळेना.
मी विचारमग्न स्थितीत असतानाच तो समोर आला आणि हाताची पाच बोटांची चिमुट पुढे केली. मलाही काही समजत नव्हते. तशाच अवाक स्थितीत मी माझा हात पुढे केला. आणि तिळगुळाचे दहा बारा दाणे माझ्या तळव्यावर टपटपले. जसे ते दाणे तळव्यावर पडले तसा एकदमच मी आमच्या भावंडांच्या बालपणात फेकला गेलो. ते थंडीतले गार गार दिवस आणि संक्रांतीच्या दिवसांची गम्मत एक क्षणात तरळून गेली. दिवस दिवस भर आम्ही भावंडे एकमेकाला उगाचच तिळगुळ देवून "गोड गोड बोलण्याच्या" शुभेच्छा देत होतो. एकमेकाच्या हातातील हलव्याचे दाणे हिसकावून खात होतो. एकूणच दिवसभर धमाल मस्ती करून संध्याकाळी पुन्हा नव्या जोशाने संपूर्ण गावभर, गल्लोगल्ली आणि घरोघरी तिळगुळ वाटत हिंडत असू. शर्ट आणि चड्ड्यांचे खिसे तिळगुळाने भरून जात. किती वाटले आणि किती खाल्ले याचा हिशेब नसे.
खरंच बालपण किती निरागस क्षणांनी भरलेले असते. ती हळवी आणि निरागस मने क्षणा क्षणाला एकमेकाबरोबर कितीहि भांडली तरी रुसवा टिकवायला त्यांना जमायाचेच नाही. कितीही मोठं भांडण झालेलं असलं तरी रुसवा फार फार तर त्या संध्याकाळ पर्यंतच. दुसऱ्या दिवसाची सुरवात कदाचित आणखी एखाद्या गोड सुर्याकीरणाने व्हायची. नवा दिवस नवी मजा होती.
आम्ही मोठे झालो तसे मनाने लहान होत गेलो. लहानपणीची मोठी मने हरवून बसलो आणि मोठेपणी तिळाच्या दाण्याला लाजवतील एवढी छोटी छोटी संकुचित मने जपू लागलो, जोपासू लागलो. लहनपणी रुपया दोन रुपयाच्या तिळगूळात किती म्हणून गोडवा विकत मिळायचा! आणि आजकाल खिसे आणि खाती भरून पैसे असूनही चिमुटभर गोडवा देणारे तिळगुळाचे दुकान सापडेना झाले आहे. माल विकणारे मॉल आलेत पण जिव्हाळ्याचा, ओलाव्याचा किरण दाखविणारे किराणा दुकान गायब झालेत. घर सिमेंटची आणि मने दगडांची होत गेलीत. दूरदर्शन संच घराघरात पोचलाय आणि एकाच घरातली माणसांची मने दूर दूर दिसेनाशी झाली आहेत. whatsappच्या खिडक्या वाढल्या आहेत पण त्या खिडक्यांना ना भावनांच्या भिंती ना जाणिवेचे छत आहे. उघड्या माळावर सगळेच वावरत आहेत, आणि व्हर्च्युअल घरातून संसार करत आहेत. बोलणे कुठेच हरवून गेले आहे आणि "चॅटिंग"च चीवचीवू लागले.
"दादा, गोड राहूदे, पण किमान बोलूया का...?" डबडबत्या डोळ्यांनी त्याने मला भानावर आणलं. आणि हातातल्या हलव्याची मुठ घट्ट आवळत मी त्याला घट्ट मिठी मारली. दोघेही अश्रूंनी एकमेकांचे खांदे भिजवू लागलो. आज माझ्या लहान भावाने आपल्या मनाचा मोठेपणा माझ्याहूनही मोठा केला होता. एव्हाना इतर भावंडे घरातून बाहेर आली होती आणि आमच्या खांद्यावर आपले हात टाकून आम्हाला बिलगली होती. लहान चिमुरडी आमच्या मांड्याना आणि पाठींना बिलगली होती. आमच्या अंगणात आज एक वेगळाच वृक्ष पुन्हा उगवला होता. पुन्हा एक नवी पालवी त्याला फुटू पाहत होती. एकीचा, आनंदाचा, निरागस प्रेमाचा, आपुलकीचा आणि जिव्हाळ्याच्या गोडव्याचा एक वटवृक्ष!
सगळे वातावरण शांत होते आणि हवेतल्या गारठ्यात आमचे सुस्कारे आणि हुंदके घुमत होते.
खरंच, काही सण हे असेच असल्याच एखाद्या उद्देशाने तयार झाले असावेत. चला, बोलुयाच! आणि नुसते बोलूया नको, गोड गोड बोलूया!
🌷🌷 ***🌷🌷

Comments
Post a Comment