क्रांती आणि क्रांतिकारक




"क्रांती आणि क्रांतिकारक"
-इंदू

www.INDUJI.in


"बाबा, बाबा, हे बघा काय...!"
गलबला कोणाचा होता हे आता सांगायलाही नको. अख्खं घर डोक्यावर घेणारी आमची एकुलती एक आणि सगळ्या कॉलनीच्या गळ्यातील ताईत म्हणावी अशी आमची "शोना" अर्थात "रुधिरा". इकडचे तिकडचे चानेल ब्राउज करत असतानाच मध्येच प्रजासत्ताकदिनाची परेड दिसत होती आणि इतक्यात आमचे हे लाडके पिलू अंगणातून घरात दंगा आणि कोलाहल करत आले. बहुतेक नुकतीच शाळा सुटली होती आणि ती त्याच सुंदर गणवेशात आली होती. अंगावर पांढरा शुभ्र फ्रॉक, डोक्याला पांढराच बेल्ट आणि त्यावर रातराणी आणि अबोलीच्या फुलांचा गजरा. पायात पांढरे बूट व पायमोजे आणि हातात एक फाटलेला तिरंगा.

तो तिरंगा पुढे करतच ती माझ्याकडे धावत होती.
"बाबा, बाबा, मी किनई मी किनई आज क्रांतिकालक झाले!"

"आले बापले!" मीही कौतुकाच्या स्वरात तिला अधिक बोलते करू लागलो, "ते कॉशे कॉय बुवों?"

"मी ना, मी ना हा तिलंगा उचलला..."

"आल्ल्ले बापले, पण हा तर बाबा, साधासा तिरंगा आहे, तो उचलून तू कशी काय क्रांतिकारक झालीस...?" मीही थोडा अचंबित झालो होतो.

"शी बाबा," आणि मला जी भीती होती ते झालेच, तिने कपाळावर हात मारलाच. मोठ्यांना काही कळत असं काहीसा तिचा भ्रम होता. त्यामुळे जेंव्हा कधीही आम्ही असे काही बोललो कि ती असा कपाळावर हात मारते आणि आमच्या अल्पबुद्धीची कीव करते, "तुम्हाला न, काही म्हणजे काहीच माहित नसतं!"

"का बाबा, कॉय झालं ऑत्ता?"

"तोल, काय? हा काय नुसताच साधासा तिलंगा नाही काही...!"

"मग...??" आता मात्र माझी उत्कंठा खरंच वाढली होती. नकळत माझ्या मनातला प्रश्न माझी लेक सोडवणार होती.

"अल्ल्ल्ले बाबा, हा किनई, आमच्या शाळेच्या वाटेत पडला होता. हा आपल्या देशाचा तिलंगा आहे. आपली भालत माता आहे. त्याचा अपमान होऊ द्यायचा नसतो. हा झेंडा उचलला कि इंग्लज मालतात! आपल्या क्रांतीकालकांना त्यांनी खूप मालले आहे. तरीही, क्रांतीकालकांनी तिलंगा सोडला नाही, आणि आपली भालत माता स्वोतंत्ल झाली. म्हणून आम्ही आपल्या तिलंग्याला खाली पलू द्यायचा नाही. इंग्लजांनी कितीही मालले तलीही, प्रत्येकाने एक जली तिलंगा उचलला तली आपला देश स्वोतंत्ल होईल. समजले?"

तिचे हे छोटेखानी भाषण मनाला एका क्षणात भिडून गेले. कधीकधी लहान मुले मोठ्यांसारखी बोलून जातात आणि आपल्याला त्यांच्याहूनही लहान असल्याचा भास होतो. हल्लीच कुठेतरी वाचले होते कि, लहानांनी थोडे मोठे होऊन आणि मोठ्यांनी थोडे लहान होऊन जगले कि जीवन आनंदी होते. आज आम्हीही या धकाधकीच्या जीवनात लहानपण विसरून गेलो. आणि शाळेत मिळालेली शिकवण शाळेतच विसरून आलो. ते थोर क्रांतिकारकांचे धडे आम्ही रद्दीतल्या पुस्तकाबरोबरच विकून टाकले आणि पैसा, घर, बंगला गाडी, ह्यातच गुरफटून गेलोय. आज थोडी गरज आहे, ती पुढच्या पिढीत हि जी जाणीव जागृत होत आहे ती तशीच जागृत ठेवण्याची. त्यासाठी थोडे लहानपण स्वीकारावेच लागेल. हा छोटासा धडा आम्ही आज शिकण्याची गरज आहे. कुठेही, एक जरी तिरंगा पडलेला दिसेल तर तो उचलला पाहिजे. प्रत्येकाने एक तिरंगा जरी उचलला तरी कुठे कचऱ्यात, कुठे रस्त्याकडेला तो दिसणार नाही. ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून आणि असल्याच छोट्या छोट्या जाणीवेतून देशप्रेम वाढते. ते वाढलेच पाहिजे. वाढवलेच पाहिजे. हा एवढासा विचार छोटासाच जरी असला तरी तो तेवढाच क्रांतिकारक विचार आहे हे विसरता कामा नये. देशप्रेम जपण्यासाठी क्रांतिकारक व्हावं लागतच असं नाही. ह्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा एखाद्या क्रांतीपेक्षा कमी नाहीत.

जय हिंद!
------------
तुम्हाला हे लिखाण कसे वाटले याचा अभिप्राय मला जरूर कळवा. तसेच, आवडल्यास शेयर करा. माझे सर्व लिखाण www.induji.in या वेबसाईट वर आपण कधीही वाचू शकता. तसेच fb.me/INDUJI.in या माझ्या फेसबुक व्यक्तिरेखेला मैत्रीनिवेदनही पाठवू शकता.


------------

Comments

Popular Posts