संवाद

-इंदू शिरगावकर-
************************

टीव्ही पाठोपाठ टीव्ही शेजारील एक कोपरा टेलिफोन या एका बोलक्या पाहुण्याने घेतला. हळूहळू त्या पाहुण्याने आपले महात्म्य पटवायला आणि पटवून द्यायला सुरवात केली. दिवसागणिक रुपडे बदलून वयाबरोबर आणखीनच "चाप्टर" बनू लागला. वायरलेस झाला आणि कधी माणसाच्या खिश्यात बसायला लागला ते कळलाच नाही. नेटाने बदलणाऱ्या या पाहुण्याला नेटची साथ मिळाली आणि टीव्हीचक्क खिश्यातून फिरू लागला.

पूर्वी गल्लीतल्या एखाद्याच घरात फोन असायचा. ह्या कोपऱ्यावरच्या घरात रिंग वाजली कि त्या कोपऱ्यावरच्या घरापर्यंत फोन आल्याचा निरोप घेऊन चिलीपिली गल्लीतून ओरडत पाळायची. ज्या गृहिणीला माहेरून फोन आलेला असायचा ती बिचारी हातातली कामे जिथल्या तिथे आहे तशीच टाकून पदराला हात पुसतच धापा टाकत फोन असलेल्या घरात पोचायची आणि कट केलेला फोन पुन्हा कधी एकदा "रिंगरिंगतो" याची वाट बघत बसायची. रिंग वाजली कि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह किती अवर्णनीय असायचा म्हणून सांगावे. घडाघडा बोलायची, बोलायची ऐकायची, हसायची, रडायची, ऐकायची, आणि बोलून मोकळी झाली कि ती ताप व्याप संपून कृतार्थ व्हायची. खूप मोठा आनंद झाल्याचे समाधान तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहायचे. मग तिथेच थांबून ती "कुणाचा फोन, का आला होता" आणि बरेच काही त्या फोन मालकाच्या घरातल्या कुणाला तरी इत्यंभूत सांगत रहायची.

हा फोनोबा वय वाढेल तसा अधिक सुंदर झाला आणि आणि तारुण्यात पदार्पण केल्यानंतर त्याने आपले नामांतर केले. तो "मोबाईल" या नावाने इकडे तिकडे "चक्क वावरू" लागला. कळफलक जाऊन टचस्क्रीन आली तेंव्हा तर नववधूसारखा साजरा गोजरा मोबाईल त्याचे गोडवे गावे तितके थोडेच होऊन गेले. 

अश्या या सुंदर आणि वलयमय दोस्ताला आणखी काही सवंगडी मिळाले. त्यातली फेसबुक आणि WhatsApp सारखी नवी मंडळी तर सगळ्यांच्या गळ्यातील ताईत बनून गेली. फेसबुक वर ज्याचा फेस नाही असा गावागावात कोण सापडेना! त्याचबरोबर फेसबुकवर कितीतरी अनोळखी  चेहरे ओळखीत रुपांतरीत झाले. अनेक हरवलेले मित्र पुन्हा कुठेतरी सापडू लागले. बऱ्याच वर्षानंतर कुठे कुठे उडून गेलेली पाखरे आता पुन्हा त्याच जुन्या फांदीच्या आठवणीने किलबिलू लागली. पुन्हा त्या हरवलेल्या आठवणी उकरून शोधून काढण्याच्या कामाला खरा वेग आला. उत्खननात मोहेंजोदारो आणि हडप्पा संस्कृती जशी सापडावी तशी अनेक जुनी नाती सापडू लागली. कुठे कुठे नवे हिरे सापडू लागले. वा...

असो, पण इतकी स्थित्यंतरे घडत गेली त्यात एक गोष्ट हरवून गेली. ती म्हणजे संवाद! लोक chatting तर करताहेत पण त्यात संवाद उरलेला नाही. नवी ओळख तर सहज जोडली जातेय पण ती फक्त संख्याच बनून राहिली आहे. चेहरे जोडले जाताहेत पण मने जोडणारे app मात्र कुठल्याच aapstore वर उपलब्ध नाहीय. जोक ढीगभर येताहेत पण आनंद forward करणारे बटण अजून कोणत्याच अपडेट मधून मिळेना झालेय. समोरासमोर बसून बोलता येईना झालेय. ओठाने बोलणारे लोक अंगठ्याने सांगताहेत, पण बोलणे मनात पोचत नाही, कारण बोलणे ऐकणारे कान फक्त गाणी ऐकत आहेत आणि डोळे ऐकायचा प्रयत्न करत आहेत. डोळ्यांना श्रवणपटल नाही जे शब्दांना भावनांच्या गाभाऱ्यात पोचवून त्यांचा खरा अर्थ मनाला सांगतील.

ते दिवस हरवले, गेले. ते घडाघडा बोलणे संपले. चिलीपिली आता खेळ सोडून गेम मध्ये व्यस्त आहेत. ती ओरडत गल्लीतून निरोप घेऊन जात नाहीत आणि कोण गृहिणी आता घाईगडबडीने कामे सोडून या घरातून त्या घरात जात नाही. आता ती घडाघडा बोलत नाही, ते ओतप्रोत जिव्हाळ्याचे शब्द स्मायली बनून आता WhatsAppच्या खिडकीतून तिलाही वेडावून दाखवतात. त्यांचे ते नकटे चेहरे खरे आनंदाचे समाधान देत नाहीत. मोबाईल मधून वाहणारे अश्रू मोबाईलच्या खिडकीच्या बाहेर येण्यापुर्वीच सुकून जातात.

हुश्श, आता, मागे तर जाता येणारच नाही, पण पुढे जाताना तरी एक करूया. आता, पुढे जाताना संवाद घेऊन जावूया. नाती फक्त नेटने नको अंतकरणाने, प्रेमाने, जिव्हाळ्याने जोडुया.


बघा, विचार करा. net pack संपायच्या आधी, पुन्हा भावना reinstall करूया. चला, नाती जोडुया. खरी नाती!

********************************

Comments

Popular Posts