हद्दवाढ: कथा फॉक्सफ्लड नावाच्या गावाची

         ---इंदू शिरगावकर


कोणे एके काळी सह्याद्रीच्या डोंगरकपारीजवळ फॉक्सफ्लड नावाचे एक आटपाट गाव होतं, त्या गावात एक पाटील होता. पाटलाला पाच-सहा पोरं. पाटलाच्या सुरवातीच्या चांगल्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यातला थोरला चांगला शिकला. मोठा वकील झाला. बाकीचे जेमतेम शिकले त्यामुळे शेतीकडे वळले. नंतर पाटलाने आपल्या शेतीच्या व इष्टेटीच्या वाटण्या केल्या. एक मोठी ठेव मात्र त्याने सुरक्षित ठेवली. त्यातून येणाऱ्या व्याजातून त्याने विभागणी करून सर्वांना त्यांच्या खर्चाप्रमाणे दरवेळी रक्कम विभागून मिळत जाईल अशी आणखी एक तरतूद त्याने केली. थोरल्याने आपल्या अक्कलहुशारीने आपल्या पदरात पडलेला भाग चांगला सुधारित केला. पुढे काही वर्षे गेली पुढची पिढी आली. तीही चांगली शिकली सवरली. अशिक्षित मुलांच्या पोरांनी सचोटीने शिक्षण घेतले हळू हळू उद्योग धंद्यात पडली. बापाच्या कष्टाचे चीज होत गेले. वकिलाची पोरे छान छौकीने चांगली वाढली पण झटपट पैश्याच्या नादात वकील बापाकडून मिळणारा पैसा कमी पडू लागल्याने गैरमार्गाला लागली. मोठमोठ्या गाड्या चांगले चांगले कपडेलत्ते, उंची परफ्युम, चमचमीत खाणे यामुळे जेमतेम मिळणाऱ्या उत्पन्नात भागेना व  घराची परिस्थिती अधिकच बिकट होत गेली. कर्जाचे डोंगर वाढत गेले. येणारे हप्ते आणि येणारे उत्पन्न याचा मेळ बसेना झाला. पावसाळ्यापूर्वी राहते घर दुरुस्त करायला दिलेला पैसा वकिलाच्या पोरांनी आपापसात वाटून घेऊन कमी पैश्यात तात्पुरती डागडुजी केली. वकिलाने घराच्या बाजाराला दिलेल्या पैश्यात पोरे गाळा मारू लागली. इकडे गरीब शेतकर्याची मुले मात्र दिवसेंदिवस प्रगती करत होती. कष्ट त्यांना फळ देत होते. हे सर्व पाहून वकील चिंतातूर झाला. असेच होत राहिले तर परिस्थिती उलट होत जाईल असे त्याला वाटू लागले. आणि पुढच्या काही वर्षात झालेही तसेच. शेतकऱ्याच्या पोरांनी स्लाबची घरे बांधली पुढे चांगली अंगणे मागे परसबाग वगैरे सुंदर परिसर बहरत गेला. या उलट मध्यभागी असलेला वकिलाचा चांगला सुंदर वाडा मात्र भेसूर आणि जुनाट दिसू लागला.

वकील सुन्न मनाने बसू लागला. परिस्थितीची चिंता अधिकच वाढत चालली. काही मार्ग दिसेना. पण, एक दिवस वकिलाला एक आयडिया सुचली. कष्टाने झटणाऱ्या भावांची परिस्थिती चांगली झालेली आहे आणि ते सर्वजन वडिलांच्या ठेवीवर अवलंबून हि नाहीत तेंव्हा वडिलांच्या ठेवीचा भावांच्या वाटणीचा हिस्सा सुद्धा आपल्या पदरात पडला तर आपली कर्जे फिटतील व त्यामुळे कोसळत्या परिस्थितीला थोडाफार आधार लाभेल हे त्याने चाणाक्षपणे जाणले. त्या योगे त्याने वडिलाच्या मृत्यपत्रातील काही बाबी समोर घेतल्या व त्याच्या आधारे गावातील पंच समितीला हाताशी धरण्याचे ठरविले. त्याने एक दिवस आपल्या भावांना बोलावून घेतले. त्यांच्यापुढे एक सुंदर प्रस्ताव ठेवला. प्रस्ताव असा होता कि आम्ही सर्वांनी पुन्हा एकदा एकत्र राहायचे. सर्वांनी गुण्यागोविंदाने पुन्हा एका चुलीवर शिजवून खायचे. आता शेतकरी बांधव आणि त्यांची मुले यांच्यापुढे एक भावनिक पण खूप वास्तविक प्रश्न पडला. मुळात शेतकऱ्यांच्या मुलांच्या गरजा कमी होत्या त्यामुळे त्यांच्यावर कर्जे किरकोळ स्वरुपाची व सहज फिटणारी होती. सध्या राहत असलेल्या घरांची बांधणी व मजबुती चांगली होती. सगळे सुरळीत चालले असताना वकील चुलत्याच्या कर्जाचे व खर्चाचे भागीदार का व्हावे. या सर्व बाबींचा विचार करून शेतकऱ्यांनी व त्यांच्या मुलांनी या गोष्टीला शांतपणे नकार दिला. 

आपल्यापेक्षा कमी शिक्षित भावांनी आपल्या प्रस्तावाला नकार द्यावा, हि गोष्ट वकिलाला व त्याच्या मुलांना पटली नाही. मग त्याने हि बाब वडिलांच्या मृत्युपत्रानुसार कशी योग्य आहे हे पटवून देण्यासाठी खटाटोप सुरु केला. पण बाकीचे भाऊ त्याला काही केल्या बधेनात. आता मुळात आपल्या मिळकतीत वकिलाचे स्वतःचे भागत नसताना बाकीच्या भावांनी आपल्याबरोबर राहावे हा वकिलाचा हट्ट किती योग्य आहे, याचे उत्तर सापडेना झाले आहे. 


© इंदू शिरगावकर
fb.com/INDUJI.in

Comments

Popular Posts