झेर्रो

-इंदू
fb.com/INDUJI.in
----------------------
"या चला..आतमध्ये भेटतील ते आता...!" त्या वयस्क माणसाने त्याला सांगितले आणि जणू आकाशाला हात लागल्याचा त्याला भास झाला.

या एका क्षणाची तो किती दिवस वाट बघत होता. त्यासाठी त्याने किती दिवस किती ठिकाणे त्यांच्या पाठोपाठ पालथी घातली होती. किती पैसा खर्च झाला याचा त्याला हिशेब नव्हता, कि आणखी किती खर्च होणार होता हेही त्याला माहित नव्हते. त्यांच्या एका भेटीसाठी त्याला आणखी किती दिवस किती शहरे भटकावे लागणार होते हेही त्याला ठावूक नव्हते. त्यांची संवादफेक, त्याचं ते अवेशातलं रूप, त्यांचा तो स्टेजवरचा निर्विवाद जगाजेत्याचा वावर त्याने प्रत्येकवेळी पहिल्या दुसऱ्या रांगेतून असा आसुसलेल्या नजरेने डोळे भरून बघितला होता. लोखंड वितळवून ओतावे तसा ओतून घेवून प्रत्येक मुद्रेचा ठाशीव साचा बनवून मनात मांडला होता. घरात दिवस रात्र त्यांच्या पात्राचा संचार घेवून वावरत होता. त्यांची ओळ नि ओळ त्याला त्याच्या स्वतःच्या शब्दाहूनही जास्त माहितीची आणि जवळची होती. घरभर त्यांच्या नाटकांच्या जाहिराती भिंतीच्या भिंती भरून गेल्या होत्या. त्यांचा कुठला शो कुठे किती वाजता झाला होता ते कुठल्या शोला काय गम्मत झाली होती इथपर्यंत सगळे काही त्याला त्यांच्यापेक्षा जास्त माहित होतं. एक दिवस त्यांच्यासारखाच मोठा नट व्हायचं हेच जणू त्यानं मनाशी ठाणलं होतं.

किती प्रयत्न करून त्याला त्यांची भेट होऊ शकली नव्हती. पण, मधुआण्णा, म्हणजेच या थियेटरचे मालक यांच्याशी खूप खुशमस्करी केल्यानंतर ते त्यांची भेट घालून द्यायला तयार झाले होते. एवढ्या मोठ्या नटाला भेटायचे म्हटल्यावर जे टेन्शन यायला पाहिजे ते स्वाभाविकपणे त्याच्या अंगात आणि रोमारोमात होते. आपल्या रोल मॉडेल ला भेटायचे हे स्वप्न आज पूर्ण होणार होते. काय बोलायचे आणि काय नाही याचा एकंदर हिशेब तो मनात घालत होता.

मनात चित्रविचित्र विचारांची घालमेल चालू असतानाच निरोप आला आणि विजेचा झटका बसावा तसा तो ताडकन बाकावरून उठून उभा राहिला. कपाळावर साचलेल्या घामाचे थेंब हातरुमालाने टिपून तो दाराच्या दिशेने चालू लागला. दाराजवळ पोचला आणि मागे पाहून शंकरला हाक मारू लागला, "शन्क्र्या, लेका पळ कि लवकर!"
त्याचा मित्र आणि फोटोग्राफर शंकर आपला कॅमेरा सांभाळत धावू लागला. पुढे हा आणि मागोमाग शंकर आत आले. 

तो त्यांच्या समोर आला आणि उभा राहिला. समोरच एका अलिशान सोफ्यावर ते ऐसपैस बसले होते आणि शेजारच्या व्यक्तीबरोबर त्यांचे बोलणे चालू होते. त्याचं ते राजस रूप तो एवढ्या जवळून पहिल्यांदाच पाहत होता. त्यांची पडद्यामागची ऐट आणि रुबाब तो पहिल्यांदाच बघत होता. एका महानटाचं आयुष्य त्याला या प्रत्येक क्षणात जास्तच भुरळ घालत होतं. तो अवाक नजरेने त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे बघत होता. त्यांच्या बोलण्याची लकब, त्यांचे हावभाव, त्यांची होणारी सरबराई हे सगळेच त्याला आकर्षित करत होतं. 

बराच वेळ तो तसाच उभा होता त्याच्या थोडा मागे शंकर उभा होता. बराच वेळ गेला. हातांच्या तळव्याला सुटलेली सर्दी अधिकच वाढत गेली होती. याची अस्वस्थता नको तेवढी वाढलेली. आता त्यांचे लक्ष आपल्याकडे जाईल, नंतर जाईल म्हणून तो तसाच कितीतरी वेळ उभा होता. शंकरला मात्र या गोष्टीचा विलक्षण कंटाळा आला होता. शंकर मध्येमध्ये त्याला पाठीमागून खोचकत होता. पण, याने तिकडे जाणून बुजून संयमाने दुर्लक्ष केले. शंकराची चुळबुळ आणि याची उत्कंठा विलक्षण वाढली होती. पण, जोपर्यंत त्यांचे इकडे बघून स्मित येत नाही तोपर्यंत काही करताही येत नव्हते. स्वस्थ उभे राहणे हा एकमेव पर्याय त्याच्याकडे होता. मध्यंतरी अनेक बडे लोक आणि आसामी वाटाव्या अश्या व्यक्ती तिथे येत होते आणि हस्तांदोलन करून काही बोलून जात होते. पण त्यांनी एक कटाक्षही अजून याच्याकडे टाकला नव्हता. जेमतेम बारा पंधरा फुटावर तो उभा असूनही तो दुर्लक्षित होता.

अखेरीस, मनाचा हिय्या करून त्याने त्यांना बोलावयाचे ठरवले. पण त्याला आतूनच ते योग्य वाटत नव्हते. मागून शंकर त्याला खोचकत होताच.
शेवटी कसाबसा तो "स्स सर...!" एवढे बोलला. त्यांनी एक कटाक्ष टाकला आणि पुन्हा आपल्या चर्चेत गुंग झाले.

याला त्यांचे हे वागणे थोडे विचित्र वाटले. पण खरं विचित्र तर अजून व्हायचं होतं. त्यांचं संभाषण संपलं तसे ते तेथून उठायला लागले. तसा हा समोर झाला

"सर, मी आपला खूप मोठा चाहता हाय!"

"बर, मग...?" अतिशय रुक्षपणे त्यांनी त्याच्याकडे खालून वरपर्यंत तुच्छ्पणे बघितले.

"नाही, भेटायचं हुतं, म्हणून आल्यालो..." त्यांच्या तुच्छ बघण्याला मनाला न शिवून घेता तो पुढे बोलला.

"गंगाराम..." त्यांना कोण राग आला कोण जाणे, त्यांनी तिथल्या एका वयस्क माणसाला बोलावले. " कितीवेळा सांगितले, कुणालाही असे आत सोडत जावू नका म्हणून..."

"साहेब, मधुअण्णानी सांगितलं म्हणून..." गंगाराम त्यांना सांगू लागला, पण तत्काळ त्याला हात कोपरातून उचलत त्याला पुढे न बोलण्याचा निर्देश केला आणि थोड्याश्या रागानेच  याच्याकडे बघितलं.

"बोल, ..."

याला काहीच सुचेना. तसा शंकर पुढे झाला आणि म्हणाला," सर, ह्यो डीक्टो तुमच्यावानी यक्टिंग करतोय... ह्येला आमच्या गावात तुमच्याच नावानं, ज्वेनियर परकाश कशाळकर म्हणत्यात. तुमच्या त्या संगीत केत्की नाट...." उंच उभारलेल्या हाताने शंकराचेही अवसान गळले. त्यांच्या डोळ्यातून ज्वाला भडकल्याचे दिसत होते. हा पुरता हलून गेला होता. त्याला हे कुठेच अपेक्षित नव्हते. नव्हे असे काही होईल, किंवा त्याचा आदर्श त्यापुढे अशी वागणूक देईल असे त्याने स्वप्नातही चिंतले नव्हते. मनाचे असंख्य डोळे आतल्या आत कितीतरी आसवे गाळत होते. हृदयात अश्रूंचा पूर आला होता. त्याची नजर त्यांच्या पायतानाकडे होती आणि ओघळणारे अश्रू ह्याचे अंगठे भिजवत होते.

"चल, करून दाखव... माझ्या नाटकातला एखादा संवाद...!" करड्या आवाजात त्याच्या चेहऱ्यावर आपली नजर रोखत त्यांनी आदेश दिला.

याचे खांदे आणि अवसान गळून गेले होते. तश्यातच या अचानक आलेल्या फर्माईशीने त्याला जागे केले. एक पाउल पुढे होत त्याने आपला उजवा हात समोर उचलत आणि मान उंच करून बेअरिंग घेतले, पण तुटलेल्या हृदयाने ओठांना बंद केले. त्याचा मघापासून सावरलेला संयम सुटला आणि तश्यातच तो ढसाढसा रडू लागला.

"काय औकात आहे रे तुझी...? मोठ्ठा आला मला भेटायला...! तू काय आहेस माहित आहे...? झिरो आहेस, झिरो...! गंगाराम, बाहेर काढ यांना...!" त्याच करड्या आवाजाने याचे काळीज भेगाळून गेले. 

आजपर्यंत ज्यांना हृदयात देवासारखे पूजले, ज्यांच्यावर आपल्यापेक्षा जास्त प्रेम केले त्याचं हे असलं वागणं त्याला अपेक्षित नव्हतेच. त्यांच्या प्रत्येक शब्दाने काळजाच्या ठिकऱ्या उडत होत्या आणि आयुष्यात कधीही सोसले नव्हते एवढे दुख: त्या गेल्या दोन चार मिनिटात त्याला भोगायला आले होते. शंकरने त्याच्या दोन्ही खांद्यांना धरले आणि दरवाजाच्या दिशेने चालू लागला.

नाट्यगृहाबाहेरच्या टपरीपर्यंत शंकरच्या आधाराने तो चालत आला. तिथल्या बाकड्यावर कसाबसा बसला. डोळ्यातून अश्रूंच्या धारा थांबत नव्हत्या अन सुस्कारे थांबत नव्हते. 

चहाचे दोन ग्लास घेऊन शंकर त्याच्यासमोर आला. " आरं म्हव्हन, आसू दे रं... चालायचंच..." शंकर सांत्वन करत होता, धीर देत होता. तसा त्याचा बांध आणखीनच फुटत होता. लहान मुलासारखा तो रडत होता.

"... जिजिझेर्रो..." त्या हुंदाक्यातून एवढा एक शब्द त्याच्या तोंडातून बाहेर पडला.

"आरं बाबा, तू कशाला एव्हडं मनाला लावून घेतोस? तुला जरी त्यो झेर्रो म्हणला आसला तरी तू एवढासच झेर्रो हैस रं... खरा नि मोठ्ठाच्या मोठ्ठा झेर्रो तर त्योच हाय...! त्यो मोठा नट आसल बी, खरं, जवरपातुर मोठा माणूस हुत न्हायी तवर त्येला काय किंमत हाय लेका?! खरा हिर्रू तर त्वाच हयीस भावा... कारण, तू माणूस म्हणून लय मोट्टा हैय्स! हु शांत मर्दा... दे सोडून...! एक दिवस तूबी लय मोटा हुशील. आणि असाच कोण तरी तुला भेटाय यील.... आणि कोण न्हायी भेटाय आल तर म्या यीन लेका...! मला म्हयीत हाय, तू न्हायी असा कुणाचा आप्मान करणार... कारण तू झेर्रो न्हायीस, तू हिर्रू हायीस... हिर्रू...!" शंकर त्याच्या पाठीवरून हात फिरवत होता. तोही आता हळूहळू शांत होत आला आणि समोरच्या स्टूलावरच्या ग्लासातला चहा थंड होत होता. 

********समाप्त***********

Comments

Popular Posts