*मुजरा राजं!*
   -इंदू
    www.INDUJI.in

जडशीळ साखळदंडात बंदिस्त देह आपल्या राजबिंड्या डौलात दिवाण-ए-खास च्या प्रवेशद्वारातून आत आला. साखळ दंड पकडणारे ते आजूबाजूचे दहा बारा सैनिक त्या गजकेशरी समोर जणू कोल्ही-कुत्री वाटावी अशीच भासत होती. त्या दखनेच्या युवराजाचा जोश आणि रुबाब त्या साखळदंडातूनही झाकोळला जात नव्हता, उलट त्या साखळ्यांना एक अलौकिक तेज, एक अस्मानी झळाळी लाभली होती. अशा रुबाबदार राजाला असले पोलादी अलंकाराच जास्त शोभिवंत दिसतात.
पावलागणिक तो अजस्त्र देह दरबाराच्या मध्यभागापर्यंत येताना बादशहासुद्धा मनोमन चाचरालाच होता. आतून तो हबकला होता. त्याची विचार शृंखला त्याला अस्वस्थ करत होती. आतल्या आत तो विचार करत होता, " अरे हा छावा, असाच ह्या साखळ दंडातून सुटून माझ्याकडे झेपावला तर? ला उला हु कुवत, माझ्या ह्या म्हाताऱ्या झालेल्या चीपाडी देहाची काही खैर नाही. हा शेराचा छावा मला ह्या भर दरबारात कच्चा फाडून-सोलून खाईल. त्याच्या डोळ्यातील आग माझा कलिजा इथपर्यंत शिलगावत आहे. छे छे! याला तिथेच थांबवा!" आणि आपसूकच त्याचा हात वर गेला. 

साखळ्या खेचल्या गेल्या आणि एकच छ्णकर त्या शांत दरबाराच्या चारी कोपऱ्यातून प्रतिध्वनित झाला. त्या भरल्या दरबारात एकही श्वास असा नव्हता , जो त्या क्षणावर थांबनव्हता. एकही हृदय त्या क्षणी त्या दरबारात नव्हते जे ठोका द्यायला चुकले नव्हते. ते इवले इवले सैनिक तर जीवाच्या आकांताने साखळदंड खेचत होते आणि सह्याद्रीच्या कडेकपारीचा अनभिषिक्त सम्राट त्यांच्यावर दया येवून किंचित थांबला. दमछाक झालेले सैनिक आपला प्राण पणाला लावून त्याला खेचत होते, मात्र त्यांच्या खेचण्याचा काडीचाही परिणाम त्याच्या एकूण हावभावातून दसत नव्हता. जणू तो हेच जाणवून देत होता कि, हे शांत उभे राहणे माझा स्वभाव आहे, नाहीतर, अजून असा साखळ दंड अजून कुठल्या लोहार खाण्यात तयार झालेला नाही, जो या संभाला बांधून ठेवेल. अस पोलाद अजून बनलं नाही ज्याच्या भाल्यानं या संभाच्या कातडीला जखम होईल. अशी समशेर झाली नाही जिचं पात संभाच्या चीलखताला भेदू शकेल. हा छावा आहे. कोल्ह्याकुत्र्यांची भीती त्याला कधी स्वप्नात सुद्धा वाटणार नाही. आणि मी शांत आहे म्हणून तू तिथे त्या तख्तावर बसून भुंकू शकतोयेस.

"बोलो संभा, तुम्हारे इस नादानी कि क्या सजा तुम्हे दि जाये?" उसन्या अवसानाने त्या धूर्त बादशाहने संवादास सुरवात केली.

शंभूराजा केवळ फुलत्या अंगारानी आणि सळाळत्या त्वेषाने बादशाहाकडे बघत होता.

"बोलो शम्बाजी राजे, बोलो| आप हमारे मेहमान हो| आपकी क्या खिदमत कि जाये?"

"खिदमत? हं!" उपहासिक हुंकार देत राजांनी आपल्या उजव्या खांद्याला थोडा झटका दिला. तिकडचे ते तिघे चौघे अपादमस्तक धडपडले.

"शम्बाजी, आप वाकई में गरम मिजाज हो| आपके इसी मिजाजने आपको युं हमारे सामने खडा किया है|"

"माझ्या गरम सोभावानं न्हायी मी हितं हुभा. माझ्या अति ईश्वासान आणि घातकी  शेंड्यांच्या कपटी राजकारणानं मी आज हितं हुभा हाय. हा शिवाजीचा संभा आहे, मैदानातली हार ह्या संबानं आजून बगीटल्याली न्हाई. आणि जवर ह्या छाताडाच्या भात्यात वारं हाय तवर बग्णार बी न्हायी. आजून तुज्या ह्या वाळक्या अंगात रग शिल्लक आसल तर उतर मैदानात!"

"संबाजी!" बादशहा समजावणीच्या स्वरात बोलू लागला. "तुम खरेच नादान हो| अरे  जर तुझे मैदानात हरवायचं होता तो मै इथे बैठा नाही होता| मुझे मालूम है, मराठा मैदान में हारता नही| उसे हराना इतना आसान नही है| इसीलिये तो मैने तुझे युं पकडा है|"

"तेच तर सांगतोय मी! फक्त एकदा भीड माझ्याशी मैदानात. तुझी अख्खी फौज आणि दखनेतनं मी एकटा! असेल कबुल तर बोल, आणि खोल हे साखळ दंड!"

"वो सब छोड| लडाई झगडे तो होते रहेंगे| मै उसमे होनेवाली हार जीत ह्या गोष्टीत अडकून पडत नाही| मेरा मशवरा लेलो, तुमभी ये सब छोड दो| मरे साथ आवो| इस्लाम कुबूल करो और उस परवरदिगार कि इबादत करो| अल्ला ताला बहोत ख़ुशी होगी अगर तुम और मै इस हिंदोस्ता कि जागीर साथ मी चालायेंगे|" बादशाहने लोण्याहून मऊ शब्दात त्या धगधगत्या विस्तावापुढे आपला प्रस्ताव ठेवला.

"हे सपान बगायचं सोडून दे तू. इमान इकून जागिरी मिळवायपेक्षा तुझ्या नरडीचा घोट घेऊन हि जागिरी मिळायला मला जास्त बरं वाटल."
हि वाक्ये दरबारात गुंजली आणि दरबारात एकाच कोलहाल झाला. सगळ्या वजीरातीच्या पुढे बादशहाच्या नरडीचा घोट घ्यायची भाषा झाली होती. आजवर असे धाडस ह्या दरबाराने बघितले नव्हते, कि ऐकले नव्हते. दरबारातील सगळ्या मात्तबरानी आवंढे गिळले. पुढे काय होणार किंवा होऊ शकेल याचा अंदाज कुणालाच नव्हता. पण जे काही घडणार होतं ते अभूतपूर्व होणार होत. कारण अशी गुस्ताखी या पूर्वी कधी ह्या तख्तापुढे झालीच नव्हती. झाली नव्हती? झाली होती. काही वर्षापूर्वी याच दिवान ए खास मध्ये याच छाव्याच्या बापाने खुद्द श्रीमंत छत्रपती शिवरायानी अशीच गुस्ताखी केली होती. पण तेंव्हा निसटून गेलेला "सिवा" पुन्हा हातात सापडला नव्हता. 

चुळबुळ शांत होत गेली आणि बादशाहने पुन्हा  आपल्या जीर्ण आवाजात विचारले
"देख लो संबा! सोच लो! बाद मी पछतावा करना पडेगा!"

"पस्तावा? आरं जीव गेला तरी मराठी रक्तानं गुलामी पत्करली न्हायी आणि मी तर त्या छत्रपतीच्या रक्ताचा गोळा हाय, ज्यानं अखंड जिन्दगानीत कैकांची गुलामी सपिवली. आणि तू त्या सुर्येपुत्राच्या वट्टयात उजेडाची भिक घालणार? औकातीत रहा!"

"बस्स! ले जावो इस नादान गुस्ताख को! इसकी ये तिखी जुबान काट दो! इसकि ये अंगार बरसानेवाली आंखे नोच दो| इसको इस तरह तडपा दो कि ये मौत के लिये तरस जाये| मेरे सामने अपनी मौत के लिये गीडगीडाये| तरसे, तडपे और मरणे कि इल्तेजा करे| उसे तब तक मेरे सामने मत लाना जाब तक इसका गुरुर ना टूट जाये| और अगर उसका गुरुर टूटणे से पेहले इसकी मौत आ जाये तो इसकी मौतको मिसाल बना दो| ताकी कोई और नादान हमारे सल्तनत के सामने ऐसा गुरुर न कर सके|"

आणि यानंतर जे झालं ते मराठ्यांच्या मानाचा इतिहास ठरलं. बादशाहने यम यातानेहून कितीतरी यातना माझ्या राजाला दिल्या. का तर, माझ्या राजानं गुलामी पत्करावी, धर्म बदलावा. या माझ्या राष्ट्रवीरांनं तेंव्हा धर्म बदलला असता तर कदाचित अर्धा हिंदुस्तान परत पदरात पडला असता. पुन्हा जीवन जगता आलं असतं. पण, माझ्या राजानं मौत पत्करली पण, धर्म सोडला नाही. याच माझ्या राज्याच्या महाराष्ट्रात आज ५ हजार १० हजार रुपयांच्या आमिषान कित्येक बहुजन धर्म बदलतात, बघून वाईट वाटतं. हे तेज आणि जाज्वल्य थोर पूर्व पुण्याईने मिळाले आहे. ते दीड दमाडीला विकणाऱ्यांना काय कळणार? हा जन्म या भूमीत आणि या जातीत मिळाला तो हजारो जन्म नरकात सोसल्यानंतर मिळाला आहे, याची ठाम जाणीव माझ्या राजानं आपल्या जीवनात तर दिलीच पण आपल्या स्वाभिमानी मरणानं सुद्धा दाखवून दिलं.

मुजरा राजं! तुमच्या जीवनाला आणि तुमच्या मरणालासुद्धा!

या माझ्या थोर राजाला मी आज मन:पूर्वक श्रद्धांजली वाहतो. सर्व स्वाभिमानी आणि धर्माभिमानी मराठी भावंडांना राष्ट्रवीर संभाजी महाराजांच्या ३३४ व्या राज्याभिषेकाच्या हार्दिक शुभेच्छा.

जय जिजाऊ | जय शिवराय | जय रौद्रशंभो ||

    (हे स्वैर लिखाण आहे. माझा इतिहासाचा अभ्यास तितका नाही. पण तरीही जितकी जाणीव व माहिती होती त्यावर आधारित हे लिखाण केले आहे. चूकभूल देणे-घेणे. कुणाच्याही धार्मिक भावना दुखावणे हा उद्देश नाही)


तुम्हाला हे लिखाण कसे वाटले याचा अभिप्राय मला जरूर कळवा. तसेच, आवडल्यास शेयर करा. माझे सर्व लिखाण www.induji.in या वेबसाईट वर आपण कधीही वाचू शकता. तसेच fb.me/INDUJI.in या माझ्या फेसबुक व्यक्तिरेखेला मैत्रीनिवेदनही पाठवू शकता.

Comments

Popular Posts