"वट पौर्णिमा"

"वट पौर्णिमा"

"अग ए... आज तरी शांत हो...!"
"...",  तसाच रागाचा कटाक्ष माझ्याकडे टाकून
"नव्हे म्हणजे...! मी काही मस्करी बिस्करी करत नाही तुझी...!"
"ते दिस्तैच... नऊ वाजलेत तरी अजून अंथरुणातून उठायचा पत्ता नाही. इथं चहा आणून ठेवलाय तो थंड गार होऊन गेलाय. ती तोंडावर खुट वाढलेत त्याला काडी लावावी...! ती नाही...! अजून केर कचरा नाही... धुनी नाहीत... त्या छोटीला अजून अंघोळ घातलेली नाही. तो दूधवाला आज कुठे कडमडलाय देव जाणे! ते रात्री मित्र मंडळ घेऊन बसला होतात मच बघत तो हॉल तसा विस्कटून पडलाय...! शी बाई... काय काय करायचं एकट्या बाईनं! हे बघा... हा पेपर... काल सकाळी वाचायला घेतला होतात तो सगळ्या बेडरूमभर पसरून गेलाय...!
एकच तोफेतून असंख्य गोळे असे सटासट बाहेर पडत होते कि मध्येच एखादी छोट्याश्या बंदुकीची गोळीसुद्धा बाहेर पडायला संधी नव्हती.
या गलक्यात कमी म्हणून कमी कि काय... बाहेर मोठ्या चिरंजीवांनी ते शिंच्यान कि काय ते हे मोठ्या आवाजात लावून ठेवले होते. ते हि मधेच "यें... बें" करत होते... त्यामुळे एकंदर या 'हलगीच्या' ठेक्यात ते मध्ये मध्ये 'पिपाणी' वाजल्याचा आभास निर्माण करत होते.

अखेरीस... धर्मपत्नी कपाटाकडे वळली आणि तिथल्या काचेच्या वस्तू नीट करू लागली. 
वातावरण हलके करण्याच्या उद्देशाने थोड्या मिस्कील स्वरात मी बोलायचे म्हणून बोललो...
"अग, आजच्या सणाचे नाव वटसावित्री न ठेवता... वटवटसावित्री ठेवायला हवे होते... खी: खी:...!"
आणि अखेरचा खी: यायच्या आतच त्या गृहलक्ष्मी रूपातील कडकलक्ष्मीने पाठ न परतता जे हातात होते ते तसेच मागे भिरकावले.

*****
मला जाग आली... डोक्याला पट्ट्या बांधल्याचे मला जाणवत होते... बाजूला हिरवे पडदे होते... एकंदर मी माझ्या बेडरूममध्ये नव्हतो तर हॉस्पिटलमध्ये होतो...

"उठलात..., बाई बाई बाई... पेपरवेट माझ्या लक्षातच आला नाही... थांबा तुमच्या पाया पडते... सकाळी विसरूनच गेले...!"

Comments

Popular Posts