गुणदोष
रात्रीस काजव्यांचा जल्लोष पाहिला मी
सूर्यास टाळण्याचा उद्घोष पाहिला मी
कोणी मरे उपाशी, पिकवून शेत सारे
जे माजले तयांचा परिपोष पाहिला मी
लावण्य ते जपाया काटाच जन्म घेई
माझ्याच आत ऐसा गुणदोष पाहिला मी
ऐश्वर्य काल माझे मी वाटले जगाला
माझ्याच सोयऱ्यांचा मग रोष पाहिला मी
चिंतेत पोरटीच्या, तो बाप खंगलेला
'नारी सशक्त झाली' जयघोष पाहिला मी
वृद्धाश्रमे जगी या दररोज वाढणारी
वंशास दीप मागे तो शोष पाहिला मी
पाहून हाल माझे गर्दी उदार झाली
खपताच बाद नाणे संतोष पाहिला मी
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

Comments
Post a Comment