हल्ली


जीवघेणे कायदे झालेत हल्ली
लोकशाही चालते झोपेत हल्ली

गप्प का झालेत सारे बोलणारे?
ओतते पाणी कुणी तोफेत हल्ली

फाळणीचे ज्ञान आले पुस्तकांनी
राम अल्ला भांडती शाळेत हल्ली

पेटले आकाश माझे आसवांनी
शोधतो मी चांदण्या राखेत हल्ली

अंगणाशी ऐक टाहो सानुल्याचा
घेतली तू नोकरी काखेत हल्ली

वाटतो मज चेहरा तो ओळखीचा
मी स्वतःला भेटतो वाटेत हल्ली

काळरात्री संपण्याची वेळ येते
तेवतो मी एक या आशेत हल्ली


🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

Comments

Popular Posts